Silver Jewellery Cleaning: चांदीचे दागिने घालण्याची अनेकांना आवड असते. विशेषतः चांदीचे कडे, ब्रेसलेट, पैंजण, चैन अधिकच शोभून दिसतात. धार्मिक मान्यतेनुसार चांदीचे दागिने शुभ मानले जातात. मात्र, सतत वापर केल्यामुळे काही दिवसांनी चांदीच्या दागिन्यांची चमक कमी होऊ लागते. अनेकदा चांदीचे दागिने काळे पडतात. हवेतील गंधक, घाम, परफ्युम, लोशन आणि पाण्यामुळे चांदीवर सिल्व्हर सल्फाइडचा थर तयार होतो. यामुळे चांदी काळी पडते. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही चांदीच्या दागिन्यांचा काळेपणा कमी करून त्यांची चमक परत मिळवू शकता.
बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइल
चांदीवरील काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि ॲल्युमिनियम फॉइलचा वापर करता येतो. यासाठी एका भांड्यात ॲल्युमिनियम फॉइल अंथरून त्यात गरम पाणी घ्या. त्यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ मिसळा. त्यानंतर काळे पडलेले चांदीचे दागिने या पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन मऊ कापडाने पुसून घ्या. मात्र, खडे, मोती किंवा नाजूक डिझाईन असलेल्या दागिन्यांसाठी ही पद्धत वापरू नका.
पांढरी टूथपेस्ट आणि मऊ ब्रश
चांदीच्या दागिन्यांवर हलका काळेपणा किंवा धूळ साचली असेल तर पांढऱ्या टूथपेस्टचा वापर करू शकता. यासाठी दागिन्यांवर टूथपेस्टचा पातळ थर लावा. मऊ ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने स्वच्छ करा. त्यानंतर कोमट पाण्याने दागिने व्यवस्थित धुऊन घ्या. टूथपेस्ट दागिन्यांवर राहणार नाही याची काळजी घ्या. शेवटी मऊ कापडाने दागिने कडे कोरडे करा. मात्र, टूथपेस्टमुळे चांदीवर ओरखडे पडू शकतात, त्यामुळे आधी छोट्या भागावर चाचणी करा.
लिंबाचा रस आणि मीठ
चांदीचा काळेपणा कमी करण्यासाठी लिंबाचा रस आणि मिठाचा वापर करण्याचा घरगुती उपायही केला जातो. यासाठी अर्ध्या कप पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळा. या मिश्रणात चांदीचे दागिने काही मिनिटे ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन मऊ कापडाने पुसा. मात्र, आम्लामुळे काही दागिन्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नाजूक किंवा खडे असलेल्या दागिन्यांवर हा प्रयोग टाळा.
चांदीचे कडे काळे पडू नयेत म्हणून काय कराल?
चांदीच्या दागिन्यांची चमक टिकवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. परफ्युम, डिओडोरंट किंवा लोशन लावल्यानंतरच चांदीचे दागिने घाला. अंघोळ करताना, पोहताना आणि घरातील कामे करताना दागिने काढून ठेवा. वापर नसताना चांदीचे दागिने मऊ कापडात गुंडाळून किंवा झिप-लॉक बॅगेत कोरड्या जागी ठेवा. यामुळे ओलावा आणि हवेचा संपर्क कमी होऊन चांदीची चमक टिकवण्यास मदत होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.