लग्नसमारंभ, सण-उत्सव किंवा खास प्रसंगी नेसल्या जाणाऱ्या बनारसी आणि सिल्कच्या साड्या प्रत्येक महिलेसाठी खास असतात. या साड्यांवर सुंदर जरीकाम, नाजूक भरतकाम, मोती आणि आकर्षक नक्षीकाम केलेले असते. त्यामुळे त्यांची स्वच्छता करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. चुकीच्या पद्धतीने साडी धुतल्यास तिचा रंग फिका पडू शकतो, चमक कमी होऊ शकते किंवा जरीकाम खराब होण्याची शक्यता असते.
अशा वेळी महागड्या साड्या ड्राय क्लीनिंगसाठी देणे हा एक पर्याय असतो. मात्र, काही विशिष्ट प्रकारच्या सिल्क साड्या योग्य काळजी घेऊन घरच्या घरीही स्वच्छ करता येतात. जाणून घेऊया सिल्क साडी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
साडी स्वच्छ करण्यापूर्वी ती शुद्ध सिल्कची आहे, बनारसी सिल्कची आहे की त्यावर जरीकाम आणि भरतकाम केलेले आहे, हे तपासून घ्या. साडीच्या लेबलवर 'ड्राय क्लीन ओन्ली' असे नमूद केले असल्यास ती घरच्या घरी धुणे टाळावे. विशेषतः जुनी, महागडी किंवा रंग सोडण्याची शक्यता असलेली साडी ड्राय क्लीनिंगसाठी देणे अधिक योग्य ठरते.
साडीवर थोडीफार धूळ किंवा हलका मळ असेल आणि तिच्या लेबलवर हाताने धुण्याची परवानगी असेल, तर थंड पाण्याचा वापर करता येतो. एका टबमध्ये थंड पाणी घेऊन त्यात थोडेसे सौम्य डिटर्जंट किंवा सिल्कच्या कपड्यांसाठी वापरले जाणारे विशेष क्लिनर मिसळा.
त्यानंतर साडी पाण्यात हलक्या हाताने स्वच्छ करा. साडी जोरात घासू नका किंवा जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवू नका. स्वच्छ पाण्याने ती अलगद धुऊन घ्या. साडीतील अतिरिक्त पाणी काढण्यासाठी ती स्वच्छ टॉवेलमध्ये गुंडाळा. मात्र, साडी पिळणे टाळा.
साडीवर जरीकाम, सिक्विन, मोती किंवा जड भरतकाम असल्यास अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. अशा साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुणे टाळावे. मशीनच्या फिरण्यामुळे नाजूक धागे निघू शकतात, तसेच साडीवरील सजावट आणि नक्षीकाम खराब होऊ शकते.त्यामुळे जरीकाम किंवा जड भरतकाम असलेल्या साड्या घरच्या घरी धुण्याऐवजी व्यावसायिक ड्राय क्लीनिंगसाठी देणे अधिक सुरक्षित ठरते.
सिल्क साडी स्वच्छ केल्यानंतर ती थेट कडक उन्हात वाळत घालू नका. उन्हामुळे साडीचा रंग फिका पडण्याची आणि कापडाची चमक कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे साडी स्वच्छ आणि सावलीच्या ठिकाणी पसरवून वाळत घालावी.साडी पूर्णपणे सुकल्यानंतर ती मलमलच्या किंवा सुती कापडात गुंडाळून ठेवावी. यामुळे साडीचे नाजूक कापड, त्याची चमक आणि सुंदर नक्षीकाम दीर्घकाळ टिकवण्यास मदत होते.
बनारसी आणि सिल्क साड्यांचे सौंदर्य त्यांच्या नाजूक विणकामात आणि चमकदार पोतामध्ये असते. त्यामुळे त्यांची स्वच्छता करताना घाई करू नका. साडीच्या प्रकारानुसार योग्य पद्धत निवडा आणि तिची विशेष काळजी घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.