हिवाळा सुरू झाला की कपाटातून जॅकेट, ब्लेझर आणि उबदार कपडे बाहेर काढले जातात. थंडीपासून बचाव करण्यासाठी हे कपडे उपयोगी ठरतात. शिवाय तुमचा लूकही छान दिसतो. पण अनेक महिने कपाटात ठेवलेल्या कपड्यांवर धूळ, डाग लागलेले असतात. अशावेळी हे कपडे घरच्या घरी धुवावेत की ड्राय क्लीनिंगसाठी द्यावेत, असा प्रश्न अनेकांना पडतो.
प्रत्येक जॅकेट आणि ब्लेझरचे कापड वेगवेगळे असते. काही कपडे पाण्याने सहज धुता येतात तर काही कपडे चुकीच्या पद्धतीने धुतल्यास त्याचा रंग, आकार आणि फिटिंग खराब होऊ शकतं. लोकरीचे, लेदरचे आणि आतून वेगळी अस्तर असलेले ब्लेझर धुताना जास्त काळजी घ्यावी लागते.
तुमचे महागडे हिवाळ्यातील कपडे अनेक वर्षे चांगले राहावेत असं वाटत असेल तर ते धुण्यापूर्वी त्यावर दिलेल्या सूचना वाचणं महत्त्वाचं आहे. कोणतं जॅकेट घरच्या घरी धुता येतात आणि कोणते ड्राय क्लीनिंगसाठी द्यावेत, हे जाणून घेऊया.
कॉटन आणि पॉलिएस्टरपासून बनवलेले अनेक जॅकेट घरच्या घरी तुम्ही धुवू शकता. पण धुण्यापूर्वी कपड्यावर दिलेल्या सूचना तपासून घ्या. मशीनमध्ये धुणं योग्य असेल तर कमी प्रमाणात डिटर्जंट आणि थंड पाण्याचा वापर करा. जॅकेट उलटं करून धुतल्यास बाहेरील भाग खराब होण्याची शक्यता कमी होते.
लोकरीचे कपडे चुकीच्या पद्धतीने धुतल्यास आकसतात किंवा त्यांचा आकार बदलतो. कपड्यावर ड्राय क्लीनिंग करण्याची सूचना असेल तर ते ड्राय क्लीनिंगसाठीच द्यावेत. छोटे डाग असतील तर मऊ कापडाने हलक्या हाताने पुसून काढता येतात. डाग काढताना कपडा जोरात घासू नका.
लेदरचे जॅकेट इतर कपड्यांप्रमाणे वॉशिंग मशीनमध्ये धुणं टाळावं. जास्त पाणी आणि चुकीचे क्लीनर वापरल्यास लेदर खराब होऊ शकते. त्यावरील धूळ किंवा हलके डाग काढण्यासाठी कोरड्या किंवा किंचित ओल्या मऊ कापडाचा वापर करा. डाग जास्त असतील, तर लेदर साफ करणाऱ्या तज्ज्ञांची मदत घ्या.
डेनिमचे जॅकेट घरच्या घरी सहज धुता येते. ते उलटे करून थंड पाण्यात आणि हलक्या डिटर्जंटने धुवा. गरम पाणी आणि कडक उन्हात वाळवा. यामुळे जॅकेटचा रंग फिका होऊ शकतो.
फॉर्मल ब्लेझरमध्ये आतल्या बाजूला अस्तर, खांद्यांना पॅडिंग आणि इतर भाग असतात. त्यामुळे ते सामान्य कपड्यांप्रमाणे धुतल्यास त्याची फिटिंग आणि आकार खराब होऊ शकतो. ब्लेझर धुण्यापूर्वी त्यावरील सूचना तपासा. ड्राय क्लीनिंग करण्यास सांगितलं असेल तर घरच्या घरी धुण्याचा धोका घेऊ नका.
हिवाळ्यातील कपडे वापरल्यानंतर लगेच कपाटात ठेवण्याऐवजी काही वेळ हवेत ठेवा. कपाटात ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे आहेत याची खात्री करा. कपडे स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा. जॅकेट आणि ब्लेझर योग्य आकाराच्या हँगरला टांगून ठेवल्यास त्यांचा आकार टिकून राहण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.