

बाथरूमच्या छताला लावलेला पेंट उखडत असेल तर सुरुवातीला ही छोटी समस्या वाटू शकते. पण वेळीच लक्ष दिलं नाही तर छतावरील पेंट मोठ्या प्रमाणात निघू शकतो. शॉवरच्या वरच्या भागात पेंटला फुगे येणं, एग्झॉस्ट फॅनजवळ पेंटची पापुद्रे निघणं किंवा हात लावताच पेंट गळून पडणं ही त्याची सुरुवातीची लक्षणं आहेत. अशा वेळी जुन्या पेंटवर पुन्हा नवीन पेंट लावणं हा योग्य उपाय नाही. पेंट उखडण्यामागचं कारण समजून घेऊन दुरुस्ती करणं गरजेचं आहे.
बाथरूममध्ये पेंट खराब होण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे ओलावा आणि गरम पाण्याची वाफ. गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर बाथरूममध्ये वाफ तयार होते. ही वाफ छताला लागून थंड झाल्यावर छतावर ओलावा जमा होतो. बाथरूममध्ये हवा बाहेर जाण्याची योग्य सोय नसेल, तर हा ओलावा बराच वेळ तसाच राहतो. त्यामुळे हळूहळू पेंटची पकड कमी होते आणि तो निघू लागतो.
याशिवाय जुन्या पेंटवर साबणाचे डाग, केसांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्प्रेचे थर, धूळ किंवा बुरशी जमा झालेली असू शकते. अशा पृष्ठभागावर नवीन पेंट लावल्यास तो व्यवस्थित चिकटत नाही. काही वेळा छतावर नवीन प्लास्टर किंवा भेगा बुजवण्यासाठी फिलर लावलेला असतो. अशा ठिकाणी प्रायमर न लावल्यास पेंट लवकर खराब होऊ शकतो.
छताचा पेंट दुरुस्त करण्यापूर्वी तो नेमका का उखडतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर शॉवर किंवा बाथटबच्या वरच्या भागातील पेंट निघत असेल, बाथरूममध्ये बराच वेळ वाफ राहत असेल किंवा छतावर काळ्या रंगाचे बुरशीचे डाग दिसत असतील, तर त्यामागे ओलावा हे कारण असू शकते.
काही वेळा छताच्या वरच्या बाजूने पाण्याची गळती होत असते. अशा वेळी आधी पाण्याची गळती थांबवणं गरजेचं आहे. कारण गळती सुरू असताना त्यावर नवीन पेंट लावला तरी काही दिवसांनी पुन्हा पेंट उखडण्याची शक्यता असते.
पेंट उखडण्याचं कारण समजल्यानंतर पुढचं काम म्हणजे छतावरील सैल झालेला पेंट काढणं. यासाठी स्क्रॅपरचा वापर करता येतो. छतावर जिथे पेंटला फुगे आले आहेत, तो फुगलेला किंवा कमकुवत झालेला पेंट काढून टाका. फक्त वरून दिसणारा पेंट काढण्याऐवजी जिथपर्यंत पेंटची पकड सुटली आहे, तिथपर्यंत तो काढणं आवश्यक आहे.
यानंतर सँडपेपरने त्या भागाच्या कडा घासून घ्या. त्यामुळे जुना पेंट आणि नवीन पेंट यांच्यामध्ये उंच-सखल भाग राहणार नाही. पेंट काढल्यामुळे छतावर खड्डे पडले असतील किंवा पृष्ठभाग खडबडीत झाला असेल तर त्या ठिकाणी फिलर लावू शकता. फिलर पूर्णपणे सुकल्यानंतर पुन्हा सँडपेपरने घासून छताचा पृष्ठभाग गुळगुळीत करा.
बाथरूमचं छत वरून स्वच्छ दिसत असलं तरी त्यावर साबणाचे थर, धूळ आणि इतर घाण जमा झालेली असू शकते. त्यामुळे नवीन पेंट लावण्यापूर्वी छत व्यवस्थित स्वच्छ करणं गरजेचं आहे. छतावर बुरशी आली असेल तर आधी ती योग्य पद्धतीने साफ करून त्यावर प्रक्रिया करावी. बुरशी तशीच ठेवून त्यावर पेंट लावल्यास ती पुन्हा वाढू शकते.
प्रायमर लावल्यानंतर बाथरूमसाठी योग्य पेंट निवडणं गरजेचं आहे. बाथरूममध्ये सतत ओलावा आणि वाफ तयार होत असल्याने अशा वातावरणात टिकू शकणारा पेंट वापरावा. यासाठी 'जिंसर परमा व्हाइट इंटिरिअर' हा जास्त ओलावा असलेल्या भागांसाठी तयार केलेला पेंट वापरता येतो. याशिवाय 'जॉनस्टोन ट्रेड अॅक्रेलिक ड्युरेबल मॅट' किंवा 'अॅक्रेलिक एगशेल' यांसारखे टिकाऊ फिनिश असलेले पेंटही वापरता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.