आजकालची धावपळीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेकांना हाय ब्लड शुगर, बॅड कोलेस्ट्रॉल आणि वाढत्या वजनाची समस्या जाणवते. या तिन्ही गोष्टी एकाच वेळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. दिवसाची सुरुवात आपण कोणत्या नाश्त्याने करतो याचाही आरोग्यावर परिणाम होतो.
दरम्यान याचबाबत यूट्यूब चॅनल ‘माय एक्सपर्ट डॉक्टर’च्या फाउंडर आणि एमबीबीएस, एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. शालिनी सिंह साळुंखे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून काही नाश्त्याचे पर्याय सांगितले आहेत. यामुळे तुमचं वाढतं वजन नियंत्रणात येऊ शकतं.
डॉक्टरांच्या मते, नाश्ता निवडताना असे पदार्थ घ्यावेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्याचप्रमाणे नाश्ता तयार करताना तेलाचं प्रमाण कमी असावं जेणेकरून बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका कमी राहील. त्यासोबतच नाश्त्यामध्ये पुरेसं प्रोटीन असणंही महत्त्वाचं आहे. यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
नाचणीचा डोसा हा नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यामध्ये फायबर आणि कॅल्शियमही चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. नाचणीचा डोसा खाताना त्यासोबत खोबऱ्याची चटणी आणि एक वाटी सांबार तुम्ही खाऊ शकता.
मल्टीग्रेन म्हणजेच वेगवेगळ्या धान्यांच्या पिठापासून तयार केलेले आणि कमी तेलात बनवलेले पनीर पराठे हा आणखी एक पर्याय आहे. पनीरमध्ये प्रोटीन असल्याने हा नाश्ता अधिक पोटभरीचा होऊ शकतो. हे पराठे दह्यासोबत खाल्ल्यास नाश्ता अधिक संतुलित होतो आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटू शकतं.
इडली हा सहज पचणारा नाश्ता मानला जातो. दोन मध्यम आकाराच्या इडल्या सांबारासोबत खाल्ल्यास त्यातून प्रोटीन आणि फायबर मिळू शकते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास आणि वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते. इडलीसोबत सांबार घेतल्याने नाश्ता अधिक पौष्टिक आणि पोटभरीचा बनतो.
मूग डाळीचा चिला हा प्रोटीन आणि फायबरने भरलेला असतो. दोन मध्यम आकाराचे मूग डाळीचे चिल्ले खाल्ल्याने रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठीही हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. प्रोटीन आणि फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहण्यास मदत होते आणि वारंवार भूक लागण्याचं प्रमाण कमी होतं.
फक्त नाश्ता आरोग्यदायी असणं पुरेसं नाही तर तो किती प्रमाणात खाल्ला जातो आणि तो कशासोबत खाल्ला जातो, हेही महत्त्वाचे आहे. जास्त तेल, साखर आणि मैदा असलेले पदार्थ नियमितपणे खाण्याऐवजी प्रोटीन, फायबर आणि पोषक घटक असलेल्या पदार्थांना आहारात समावेश करा. विशेषतः ब्लड शुगर, कोलेस्ट्रॉल किंवा वजनाची समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.