मेंदूमध्ये पाणी साचणे ही जीवघेणी समस्या आहे, ज्यामुळे मेंदूवर दबाव येतो.
ही समस्या जन्मजात असू शकते किंवा डोक्याला मार बसणे, संसर्ग, ट्यूमर किंवा स्ट्रोकमुळे होऊ शकते.
लहान मुलांमध्ये डोके मोठे होणे, टाळू फुगणे, उलट्या आणि चिडचिडपणा ही मुख्य लक्षणे आहेत.
मेंदूमध्ये पाणी होणं ही अत्यंत गंभीर समस्या आहे. जी योग्य वेळी लक्षात न आल्यास जीवघेणी ठरू शकते. वैद्यकीय भाषेत याला हायड्रोसिफॅलस (Hydrocephalus) असं म्हणतात. मेंदूच्या आजूबाजूला किंवा आतमधील द्रव (CSF – cerebrospinal fluid) गरजेपेक्षा अधिक प्रमाणात जमा होऊ लागला, तर मेंदूवर दबाव येतो आणि त्यामुळे अनेक गंभीर लक्षणं दिसून येतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ही सूज वाढत गेल्यामुळे मेंदू योग्य पद्धतीने कार्य करणं थांबवतो. याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर देखील होत असतो. यामध्ये काही वेळा रुग्णाचा मृत्यूदेखील होण्याची शक्यता असते.
मेंदूमध्ये पाणी साचण्याची अनेक कारणं असू शकतात. काही वेळा ही समस्या जन्मापासून देखील असू शकते. काही वेळा डोक्याला जबर मार बसणं, मेंदू किंवा मणक्याला झालेला संसर्ग, स्पायनल कॉर्डमध्ये झालेला ट्युमर किंवा स्ट्रोक यांसारख्या कारणांमुळेही मेंदूत पाणी साचू लागतं.
तज्ज्ञांनी सांगितलं की, ही स्थिती वेळेवर ओळखून उपचार केले नाहीत तर मेंदूवरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणं दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.
लहान मुलांमध्ये हायड्रोसिफॅलसची लक्षणं काहीशी वेगळी असतात. विशेषतः नवजात किंवा काही महिन्यांच्या बाळांमध्ये खालील लक्षणं दिसू शकतात:
डोक्याचा आकार मोठा दिसणे- बाळाच्या डोक्याचा आकार इतर मुलांच्या तुलनेत अधिक मोठा वाटतो.
टाळू फुगलेला असणे- डोक्याच्या वरच्या भागावर सौम्य सूज किंवा फुगवटा जाणवतो.
डोकेदुखी- जरी बाळ सांगू शकत नाही तरी रडणं, अस्वस्थता, डोक्यावर वारंवार हात नेणं ही लक्षणं असू शकतात.
उलट्या आणि मळमळ- काहीही खाल्ल्यानंतर लगेच उलटी होणं किंवा पोट बिघडल्यासारखं वाटणं.
सुस्ती आणि चिडचिडेपणा- बाळ नेहमीपेक्षा जास्त झोपलेलं असणं किंवा खूप चिडचिड करणे.
झोपेच्या सवयी बदलणे- नीट झोप न लागणं किंवा झोपेत वारंवार खडबडून उठणं.
वयस्क किंवा प्रौढ व्यक्तींमध्ये ही लक्षणं थोडी वेगळी असू शकतात आणि ती दररोजच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतात.
सतत डोकेदुखी- डोक्यात भरलेपणा जाणवणे किंवा दिवसभर डोकं दुखत राहणं.
उलटी किंवा मळमळ- खाल्लेलं पचत नाही आणि वारंवार उलटी होते.
डोळ्यांची अडचण- नजरेत बदल होणं अस्पष्ट दिसणं किंवा डोळ्यांवर ताण जाणवणं.
झोपेची अडचण- रात्री नीट झोप न लागणं, झोप पूर्ण न होणं किंवा झोपेत व्यत्यय येणं.
थकवा जाणवणं- थोडं काम केल्यावरही दम लागणं, थकवा जाणवणं.
चालताना अडखळणं- पायांवर नियंत्रण नसणं समतोल बिघडणं किंवा चालताना अडखळणं.
हायड्रोसिफॅलस ही स्थिती एकदा लक्षात आली, की त्यावर तात्काळ उपचार करणं अत्यंत गरजेचं असतं. डॉक्टर सामान्यतः मेंदूचा MRI किंवा CT स्कॅन करून निदान करतात. काही वेळा पाणी काढण्यासाठी सर्जरीची गरज भासू शकते. यामध्ये एक नळी वापरून मेंदूत साचलेलं द्रव शरीराच्या दुसऱ्या भागात वळवतात.
मेंदूमध्ये पाणी साचणे म्हणजे काय?
मेंदूभोवती किंवा आत CSF द्रव जास्त प्रमाणात जमा होऊन दबाव निर्माण होणे.
हायड्रोसिफॅलसची मुख्य कारणे कोणती?
जन्मजात दोष, डोक्याला मार, संसर्ग, ट्यूमर किंवा स्ट्रोक.
लहान मुलांमध्ये याची लक्षणे कोणती?
डोके मोठे होणे, टाळू फुगणे, उलट्या, चिडचिडपणा, झोपेचे बदल.
मोठ्या व्यक्तींमध्ये याची लक्षणे कोणती?
सतत डोकेदुखी, उलटी, दृष्टीत बदल, थकवा, चालताना अडथळे.
निदान कसं केलं जातात?
MRI/CT स्कॅनने निदान केलं जातं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.