भारतासह जगभरात कॅन्सरच्या रूग्णांमध्ये वाढ होतेय. यामध्ये फुफ्फुसांच्या रूग्णांचीही संख्या अधिक असल्याचं दिसून येतंय. धूम्रपान करणाऱ्यांना फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका असतो, हे आपल्याला माहितीये. मात्र तुम्हाला कल्पना आहे का की, जर तुम्ही धूम्रपान करत नसाल तरीही तुम्हाला फुफ्फुसांचा कर्करोग होऊ शकतो.
फुफ्फुसांच्या कॅन्सरबाबत एक बाब नव्या अभ्यासातून समोर आली आहे. मंगळवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ‘द लॅन्सेट रेस्पिरेटरी मेडिसिन जर्नल’मध्ये हा स्टडी प्रकाशित करण्यात आला होता. यामध्ये कधीही धूम्रपान न करणार्यांमध्ये फुप्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतं आणि याला वायुप्रदूषण कारणीभूत ठरू शकतं, असं म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ (IARC)मधील संशोधकांनी ‘ग्लोबल कॅन्सर ऑब्झर्व्हेटरी २०२२’ डेटामधील माहितीचा अभ्यास केला. एडेनोकार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, स्मॉल अॅण्ड लार्ज सेल कार्सिनोमा या चार पद्धतीचा राष्ट्रीय स्तरावरील फुप्फुसाच्या कॅन्सरच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला.
संशोधनातून असं लक्षात आलं की, एडेनोकार्सिनोमा हा कॅन्सर श्लेष्मा आणि पाचक ग्रंथींसारख्या द्रवरूप पदार्थ निर्माण करणाऱ्या ग्रंथींमध्ये सुरू होतो. मुळात पुरुष आणि महिला या दोघांमध्येही हा कॅन्सरचा प्रकार दिसून येत असल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ या वर्षातमध्ये कधी धूम्रपान न करणार्यांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाची ५३-७०% प्रकरणं ही एडेनोकार्सिनोमा या फुप्फुसाच्या कर्करोगाशी संबंधित असल्याचं समजतंय.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे, धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना या कॅन्सरचा धोका न करणाऱ्यांपेक्षा कमी असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण कमी होतंय. अशातच कधीही धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या फुप्फुसाच्या या कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे.
कॅन्सरमुळे होणार्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये फुफ्फुसांच्या कॅन्सरचं नाव येतं. मात्र जागतिक स्तरावर धूम्रपान न करणार्यांमध्ये फुप्फुसाचा कॅन्सर होणं हे कॅन्सर होणार्या मृत्यूचं पाचवे प्रमुख कारण ठरत असल्याचं समोर आलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.