आपल्या शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे. अनेकदा कुठलीही मोठी शारीरिक समस्या होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. हृदयविकाराच्या बाबतीत तर हे अधिक खरं आहे, कारण याची लक्षणं अनेकदा सौम्य स्वरूपाची असतात आणि त्यामुळे ती दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. असाच एक सिग्नल म्हणजे कानाच्या पाळीवर दिसणारी एक विशिष्ट रेष.
काही लोकांच्या कानाच्या पाळीवर आडव्या कोनात एक रेष ज्याला आपण सुरकुती म्हणू शकतो. या रेषेला वैद्यकीय भाषेत डायगोनल इअर लोब क्रीज (DELC) किंवा फ्रँक साइन म्हटलं जातं. अमेरिकेतील डॉक्टर सॅन्डर टी. फ्रँक यांनी प्रथम ही रेषा ६० वर्षांखालील छातीत वेदना असलेल्या २० रुग्णांमध्ये पाहिली होती. यानंतर त्यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असल्याचं निदान झालं होतं.
डॉ. फ्रँक यांनी १९७३ मध्ये न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये एक ही गोष्ट प्रकाशित करून या रेषेचा हृदयविकाराशी असलेला संबंध मांडला होता. त्यानंतर अनेक मोठ्या अभ्यासांमधून ही रेषा हृदयविकार, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार आणि इतर रक्तवाहिन्यांसंबंधी विकारांमध्ये दिसून आली.
जरी संशोधनातून या रेषेचा हृदयविकाराशी काही प्रमाणात संबंध आढळून आला असला, तरी सध्या तरी याला स्पष्ट निदानाचं प्रमाण मानलं जात नाही. म्हणजे, ही रेषा असेल तर हृदयविकार निश्चितच होईल असं नाही, पण धोका वाढल्याचं सूचित होऊ शकतं.
२०१७ मध्ये झालेल्या एका अभ्यासात स्ट्रोक झालेल्या २४१ रुग्णांवर तपासणी केली गेली. त्यापैकी १९० जणांच्या कानाच्या पाळीवर ही रेषा दिसली. स्ट्रोकसारख्या Transient Ischemic Attack (TIA) झालेल्या १५३ रुग्णांपैकी ७३% रुग्णांमध्ये फ्रँक साइन होतं. याशिवाय पूर्ण स्ट्रोक झालेल्या ८८ रुग्णांपैकी तब्बल ८९% मध्ये ही रेषा आढळली.
डॉ. मायकेल मरे यांच्या सांगण्यानुसार, “जर एखाद्याच्या कानाच्या पाळीवर ही आडवी रेषा असेल तर त्याला हृदयविकार किंवा स्ट्रोकचा धोका वाढलेला असतो. यावर ४० हून अधिक अभ्यास झाले आहेत. प्रत्येकवेळी हे खरं असेलच असं नाहीय. मात्र बहुतांशवेळी हे निरीक्षण तंतोतंत ठरतं.
ते पुढे सांगतात, “कानाच्या पाळीमध्ये बारीक रक्तवाहिन्यांचं जाळं असतं. जर त्यांना पर्याप्त प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त मिळालं नाही, तर त्यांच्या कार्यात बिघाड होतो आणि त्यामुळे ही रेषा तयार होते. त्यामुळे यामागे शारीरिक आणि शास्त्रीय कारण आहे.
डॉ. मरे यांचा सल्ला आहे की, “जर ही रेषा असेल, तर आपल्याला हृदयाच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहावं लागेल. रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता तपासून घ्यावी लागेल. आहार, जीवनशैली आणि हृदयासाठी उपयुक्त गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.