आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय.हृदयाशी संबंधित आजारांचं प्रमाण वाढताना दिसतंय. रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. शरीरात LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोका असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
चांगली गोष्ट म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वात्स्य यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमधून अशाच पाच पदार्थांची माहिती दिली आहे. या पदार्थांमध्ये विरघळणारे फायबर, चांगले फॅट्स आणि वनस्पतींपासून मिळणारे पोषक घटक असतात. त्यामुळे LDL कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
भेंडी ही केवळ चवीला चांगली नसून आरोग्यासाठीही फायदेशीर भाजी आहे. भेंडीमध्ये विरघळणारे फायबर असतात. हे फायबर पचनाच्या प्रक्रियेदरम्यान शरीरातील बाइल अॅसिडला चिकटतात. त्यानंतर शरीराला नवीन बाइल अॅसिड तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलचा वापर करावा लागतो. त्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते.
वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ओट्स हा चांगला पर्याय आहे. ओट्समध्ये बीटा ग्लुकॉन नावाचं फायबर असतं. हे फायबर आतड्यांमध्ये जेलसारखा थर तयार करते. त्यामुळे शरीरात फॅट आणि कोलेस्ट्रॉल शोषले जाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्सचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
अक्रोडामध्ये वनस्पतींपासून मिळणारे ओमेगा-३ आणि फायटोस्टेरॉल हे घटक असतात. डॉक्टरांच्या मते, हे घटक रक्तवाहिन्यांमधील सूज आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अक्रोड योग्य प्रमाणात खाल्ल्यास LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळू शकते.
अळशीच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये लिग्नन्स आणि विरघळणारे फायबर असता. हे घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांच्या मते, दररोज एक चमचा अळशीच्या बियांची पावडर खाल्ल्याने रक्तातील चरबीचं प्रमाण म्हणजेच लिपिड प्रोफाइल सुधारण्यास आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यास मदत होऊ शकते.
सफरचंद खाणंही बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. सफरचंदाच्या सालीमध्ये आणि गरामध्ये पेक्टिन नावाचं फायबर असतं. हे फायबर आतड्यांमध्ये कोलेस्ट्रॉलला चिकटतं आणि शरीरात त्याचं शोषण होण्यापासून रोखण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास फायदा होऊ शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.