हिवाळ्यात गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते. पण चहा-कॉफी खूप गरम असताना पिण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एका नव्या अभ्यासातून अतिशय गरम पेय प्यायल्याने अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं समोर आलं आहे. त्यामुळे चहा-कॉफी गरम नव्हे, तर कोमट झाल्यानंतर पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ब्रिटनमधील जवळपास 9.8 लाख लोकांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात जे लोक नेहमी अतिशय गरम चहा किंवा कॉफी पितात, त्यांच्यामध्ये अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं आढळून आलं.
अभ्यासानुसार, गरम पेय पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका जवळपास दुप्पट, तर अतिशय गरम पेय पिणाऱ्यांमध्ये हा धोका जवळपास तिप्पट असल्याचं दिसून आलं.
65 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असलेलं पेय अतिशय गरम मानलं जातं. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने हे तापमान अतिशय गरम पेयांच्या श्रेणीत ठेवलं आहे. अशा तापमानातील पेय वारंवार प्यायल्यास अन्ननलिकेच्या आतील भागाला इजा होऊ शकते.
पण 65 अंश सेल्सिअस हेच तापमान प्रत्येकासाठी धोक्याची मर्यादा असेल असं नाही. प्रत्येक व्यक्तीची गरम पेय सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. याशिवाय कपात ओतल्यानंतर चहा किंवा कॉफी हळूहळू थंड होत जाते.
कॅफेमध्ये मिळणारी कॉफी साधारणपणे 60 ते 65 अंश सेल्सिअस तापमानात दिली जाते. कॉफीची चव तयार होण्यासाठी ती आधी जास्त तापमानात बनवली जाते. त्यामुळे कॉफी थोडी थंड करून प्यायल्याने तिच्या चवीचा अनुभव बदलत नाही.
चहा किंवा कॉफी पिणं बंद करण्याची गरज नाही. पण ती खूप गरम असताना पिणं टाळावं. चहा-कॉफी थोडी थंड होऊ द्यावी आणि कोमट झाल्यानंतर प्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
ऑक्सफर्डच्या या अभ्यासात अन्ननलिकेच्या आतील भागाला झालेली इजा थेट तपासण्यात आली नव्हती. संशोधकांनी कॅन्सरच्या नोंदींच्या आधारे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे नवे रुग्ण तपासले. त्याचप्रमाणे लोक चहा किंवा कॉफी किती गरम पितात आणि किती वेळा पितात, याची त्यांनी दिलेली माहिती विचारात घेतली. अन्ननलिकेच्या आतील भागाला झालेली इजा हा या अभ्यासाचा थेट निष्कर्ष नव्हता.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहा किंवा कॉफीमुळे नव्हे, तर ती अतिशय गरम असताना वारंवार प्यायल्याने अन्ननलिकेवर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो. या उष्णतेमुळे अन्ननलिकेच्या आतील भागाला इजा होऊन कालांतराने सूज येऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यातील आवडता चहा किंवा कॉफी पिणं बंद करण्याची गरज नाही. फक्त ती गरमागरम पिण्याऐवजी कोमट झाल्यानंतर पिण्याची सवय लावावी. रोजच्या सवयीतील हा छोटासा बदल आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.