लघवी करताना रंग नेहमीपेक्षा वेगळा दिसतोय का? लघवीचा रंग अचानक गुलाबी, लाल किंवा चक्क रक्तासारखा दिसू लागला तर साहजिकच भीती वाटते. शरीरात काही गंभीर समस्या तर निर्माण झाली नाही ना, असा प्रश्नही पडतो. काही वेळा लघवीच्या रंगातील बदल काही खाण्यापिण्याच्या पदार्थांमुळे होऊ शकतो, असं वाटून लोक ही गोष्ट दुर्लक्षित करतात. मात्र लघवीत रक्त दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.
अनेक जण लघवीचा रंग बदलल्यानंतर आपण काही वेगळं खाल्लं किंवा प्यायलं असेल म्हणून असं झालं असावं, असा विचार करतात. थोड्या वेळाने सगळे ठीक होईल असं मानून ते डॉक्टरांकडे जाणं टाळतात. पण अशा प्रकारे दुर्लक्ष केल्यामुळे शरीरातील एखादी समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे लघवीत रक्त का येतं आणि त्यामागे कोणती कारणं असू शकतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
वैद्यकीय भाषेत लघवीमध्ये रक्त आढळण्याच्या स्थितीला हेमॅट्युरिया (Hematuria) असं म्हणतात. या स्थितीत लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसू शकतो. लघवीचा रंग बदलण्यासाठी रक्ताची अगदी थोडी मात्रा देखील पुरेशी असते. त्यामुळे लघवीत रक्ताचं प्रमाण कमी असले तरी त्याचा रंग स्पष्टपणे बदललेला दिसू शकतो.
हेमॅट्युरिया झालेल्या प्रत्येक व्यक्तीला वेदना होतीलच असं नाही. मात्र लघवीसोबत रक्ताच्या गुठळ्या बाहेर पडत असतील तर वेदना होऊ शकतात. काही वेळा या गुठळ्या लघवीचा मार्ग अडवतात आणि त्यामुळेही त्रास किंवा वेदना जाणवू शकतात.
लघवीच्या मार्गातील वेगवेगळ्या भागांमध्ये समस्या निर्माण झाल्यास लघवीत रक्त दिसू शकतं. त्यामागे काही सामान्य कारणं असू शकतात तर काही वेळा हे गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं.
मूत्राशय, किडनी, मूत्रमार्ग किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन किंवा सूज आली तरी लघवीत रक्त येऊ शकतं.
किडनी किंवा लघवीशी संबंधित अवयवांना एखाद्या प्रकारची दुखापत झाल्यास रक्त लघवीत मिसळू शकतं.
किडनी किंवा मूत्रमार्गात स्टोन असल्यास तो लघवीच्या मार्गाला घासू शकतो. त्यामुळे रक्तस्राव होऊन लघवीचा रंग लाल किंवा गुलाबी दिसू शकतो.
अचानक किंवा नेहमीपेक्षा खूप जास्त व्यायाम केल्यानंतर काही लोकांमध्ये तात्पुरतं लघवीत रक्त दिसू शकते. मात्र असं झाल्यास त्याकडेही दुर्लक्ष न करता कारण समजून घेणं गरजेचं आहे.
पुरुषांमध्ये वय वाढल्यानंतर BPH म्हणजेच Benign Prostatic Hyperplasia ही समस्या होऊ शकते. यामध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो. ही कॅन्सरची समस्या नसली तरी काही वेळा यामुळे लघवीत रक्त दिसू शकते.
लघवीत रक्त येण्यामागे काही गंभीर कारणेही असू शकतात. जसं की, मूत्राशयाचा कॅन्सर किंवा किडनीचा कॅन्सर यामुळेही हेमॅट्युरिया होऊ शकतो. किडनीमध्ये स्टोन असणे किंवा किडनीशी संबंधित गंभीर आजार असणं हे देखील यामागचं कारण असू शकतं.
याशिवाय शरीरात रक्ताची गुठळी तयार होण्याच्या प्रक्रियेशी संबंधित काही आजार असतील तरी लघवीत रक्त येण्याची शक्यता असते. हिमोफिलिया याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे लघवीत रक्त दिसणं म्हणजे नेहमीच कॅन्सर असं नाही. मात्र त्यामागचे नेमकं कारण शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी झालेला दिसत असेल आणि त्यात रक्त असल्याची शक्यता वाटत असेल तर ही गोष्ट स्वतःहून ठीक होईल असं समजून दुर्लक्ष करू नका. शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर आवश्यक तपासण्या करून लघवीत रक्त येण्यामागचं नेमकं कारण शोधू शकतात.
कारण समजल्यानंतर त्यानुसार योग्य उपचार किंवा औषधे दिली जाऊ शकतात. मात्र, तपासणीसाठी उशीर केल्यास काही आजारांची समस्या वाढू शकते आणि पुढे अधिक त्रास सहन करावा लागू शकतो.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.