दिवाळीचा सण सुरु झाला आहे. यातच अनेकांच्या घरात फराळ बनवण्याची लगबग सुरु झाली आहे. फराळा मध्ये काहीतरी गोड बनवताना आपण अनेकदा खव्याचा वापर करतो. पण आपण वापरत असलेला माव्यामध्ये भेसळ नाही ना? हे माहिती करुन घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
दिवाळीच्या सणात बाजारात मिळणाऱ्या खव्यामध्ये होणारी भेसळ आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. सणाच्या काळात जास्त नफ्यासाठी खव्यामध्ये डिटर्जंट, स्टार्च, सिंथेटिक दूध आणि वनस्पती तेल मिसळले जाते, ज्यामुळे अन्नविषबाधा आणि पोटात इन्फेक्शनसारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
खव्यामध्ये मैदा, आरारोट किंवा उकडलेल्या बटाट्याचा स्टार्च मिसळलेला असतो का हे पाहण्यासाठी एक चमचा खवा थोड्या पाण्यात उकळून थंड करा. त्यानंतर त्यात आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर माव्याचा रंग निळा झाला, तर त्यात स्टार्चची भेसळ आहे हे समजावे. अस्सल खवा आयोडीनच्या संपर्कात आल्यावर आपला रंग बदलत नाही.
थोडासा खवा आपल्या हाताच्या वरच्या भागावर किंवा तळहातावर ठेवून चोळा. जर खवा हळूहळू तेल सोडत असेल, तर तो अस्सल आहे. याच्या उलट, जर तो हातावर चोळल्यावर कोरडा पडला आणि त्याला साबनासारखा वास येऊ लागला तर तो नकली आहे.
थोडासा खवा बोटावर घेऊन चाखून पहा. अस्सल माव्याची चव हलकी गोड असते आणि त्याला दुधासारखा सुवास येतो. तर नकली माव्यामधून केमिकल, डिटर्जंट किंवा शिळ्या तेलाचा दुर्गंध येतो आणि त्याची चव काहीशी कवट किंवा तुरट लागते.
एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात एक चमचा खवा चांगला मिसळा आणि काही वेळ तसेच राहू द्या. अस्सल खवा पाण्यात पूर्णपणे विरघळतो आणि पाण्याचा रंग दुधासारखा होतो. पण जर माव्यामध्ये स्टार्च किंवा सिंथेटिक पावडर असेल, तर ती विरघळत नाही आणि तळाशी बसून राहते.
थोडासा मावा कढईत किंवा पॅनमध्ये मंद आचेवर गरम करा. अस्सल खवा गरम केल्यावर लगेच तूप सोडतो. मात्र, भेसळयुक्त मावा गरम करताच पटकन काळा पडू लागतो किंवा जळून कडक होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.