Ghee With Warm Water saam tv
लाईफस्टाईल

Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

Ghee Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप घेण्याची आयुर्वेदिक पद्धत पचन, बद्धकोष्ठता, सांधे, त्वचा आणि झोपेसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र प्रत्येकासाठी ही सवय योग्य नाही. कोणत्या लोकांनी तुपाचं पाणी टाळावं आणि कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळची सुरुवात चांगल्या सवयीने केली तर त्याचा परिणाम दिवसभराच्या आरोग्यावर होतो. आयुर्वेदात सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप मिसळून पिण्याची पद्धत सांगितलीये. आयुर्वेदिक मतानुसार, पाण्यासोबत तूप घेतल्याने शरीरातील वात आणि पित्त संतुलित ठेवण्यास मदत होते. देशी तूप हे आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं. मात्र प्रत्येकासाठी सकाळी तुपाचं पाणी पिणं योग्य असेलच असं नाही.

आयुर्वेदिक डॉक्टर रूपाली जैन यांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी एक कप कोमट पाण्यात तूप घेणं पचनासाठी फायदेशीर ठरू शकते. वात संतुलित राहिल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणं यासारख्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. तर पित्त संतुलित राहिल्याने छातीत जळजळ आणि अॅसिडिटीसारख्या त्रासात आराम मिळू शकतो.

तुपामध्ये कॅलरी आणि संतृप्त चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात तूप घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळू शकते. तुपासारख्या चरबीयुक्त पदार्थांमुळे शरीराला ‘ए’, ‘डी’, ‘ई’ आणि ‘के’ या चरबीत विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचं शोषण करण्यासही मदत होते.

वात-पित्त संतुलित ठेवण्यास मदत

डॉक्टर रूपाली जैन यांच्या मते, तुपामुळे शरीराला आवश्यक स्निग्धता म्हणजेच ओलावा आणि मऊपणा मिळण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार तूप वात आणि पित्त कमी करण्यासाठी उपयोगी मानलं जातं. वात किंवा पित्ताशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींना तुपाचं कोमट पाणी फायदेशीर ठरू शकतं. ज्या लोकांचं वजन सहज वाढत नाही त्यांच्यासाठीही हे उपयुक्त मानलं जातं. अशा व्यक्तींनी रोज तुपाचं पाणी घेतल्यास वजन व्यवस्थित राखण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होऊ शकते.

सांधेदुखीतही मिळू शकतो आराम

तुपामध्ये स्निग्धता म्हणजेच चिकटपणा आणि मऊपणा असतो. त्यामुळे ते सांध्यांसाठीही उपयुक्त मानलं जातं. रोज सकाळी कोमट पाण्यात तूप घेण्यामुळे सांध्यांना स्निग्धता मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सांधेदुखी किंवा ऑस्टिओआर्थरायटिसच्या त्रासातही काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

त्वचेची चमक वाढवण्यास मदत

तुपाचे फायदे फक्त पचन आणि सांध्यांपुरते मर्यादित नाहीत. तुपाचं सेवन केल्याने शरीरातील स्निग्धता टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे त्वचेतील ओलावा आणि चमक टिकवण्यास मदत होऊ शकते. यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते.

स्मरणशक्ती आणि एकाग्रता

आयुर्वेदात तुपाला ‘मेध्य’ म्हटलं जातं. म्हणजेच त्याचा संबंध मेंदू आणि मानसिक काम करण्याच्या क्षमतेशी जोडला जातो. तुपाचं कोमट पाणी घेतल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे मानसिक आरोग्यही चांगले राहण्यास मदत मिळू शकते.

झोप सुधारण्यासही मदत

सकाळी तुपाचं कोमट पाणी घेतल्याने झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते. डॉक्टर रूपाली जैन यांच्या मते, आयुर्वेदात तूप स्निग्ध आणि वात संतुलित करणारे मानले जाते. शरीर आणि मनाला शांतता व स्थिरता मिळाल्याने झोप येण्यास मदत होऊ शकते. मात्र, झोप न येण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामुळे केवळ तुपाचं पाणी हा झोपेच्या समस्येवरील उपचार मानता येणार नाही.

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत

तुपाचं कोमट पाणी घेतल्याने शौचावेळी कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या त्रासातही आराम मिळू शकतो. रोज एक कप कोमट पाण्यात एक चमचा तूप घेतल्याने दीर्घकाळापासून असलेल्या बद्धकोष्ठतेतही फायदा होऊ शकतो.

कोणत्या लोकांनी तुपाचे पाणी घेऊ नये?

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते कफाची प्रकृती असलेल्या व्यक्तींनी तुपाचं कोमट पाणी घेणं टाळावं. याशिवाय ज्या लोकांचं वजन जास्त आहे, शरीरात जास्त चरबी जमा झाली आहे, भूक कमी लागते किंवा पचनशक्ती कमी आहे अशा व्यक्तींनी हे पाणी घेण्यापूर्वी काळजी घ्यावी.

फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या तसंच हायपोथायरॉइडिझमची समस्या असलेल्या व्यक्तींनीही तुपाचे कोमट पाणी पिणे टाळावे, असे आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकणात देखील दुष्काळाची परिस्थिती

Political News: मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, राजकीय समिकरणं बदलणार

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT