रोज १० हजार पावलं चालणं हे अनेकांसाठी फिटनेसचं लक्ष्य असतं. मात्र आरोग्य चांगले ठेवण्यासाठी १० हजार पावलं चालणं हाच एकमेव पर्याय नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना वेळेअभावी दररोज इतकं चालणं शक्य होत नाही. काहींना रोज त्याच पद्धतीने चालण्याचा कंटाळाही येतो. अशावेळी कमी वेळात शरीराला चांगला व्यायाम मिळवून देणारे काही पर्याय करता येतात.
चालण्यासोबतच काही व्यायाम केल्याने हृदयाचं आरोग्य, शरीराची ताकद, सहनशक्ती आणि शरीराचा समतोल सुधारण्यास मदत होते. त्यामुळे १० हजार पावलं चालता येत नसतील तर खालील ५ व्यायाम तुम्ही करू शकता.
दोरीवरच्या उड्या म्हणजे फक्त मुलांसाठीचा खेळ नाही. हा हृदयाची गती वाढवणारा चांगला व्यायाम आहे. साधारण १० मिनिटे दोरीवर उड्या मारल्याने ३० मिनिटं चालण्याइतक्या कॅलरी खर्च होण्यास मदत होऊ शकतात.
दोरीवरच्या उड्यांमुळे हृदय आणि फुफ्फुसांचं कार्य सुधारण्यास मदत होतं. तसंच शरीराचा समतोल, चपळता आणि हालचालींमधील योग्य वेळ साधण्याची क्षमता वाढते. उड्या मारल्यामुळे हाडांनाही आवश्यक असा व्यायाम मिळतो.
बर्पी हा संपूर्ण शरीराला व्यायाम देणारा प्रकार आहे. या व्यायामात पाय, हात, छाती आणि पोटाचे स्नायू काम करतात. बर्पी करताना हृदयाची गती वेगाने वाढते. त्यामुळे कमी वेळात चांगला व्यायाम होतो आणि शरीराची सहनशक्ती वाढण्यास मदत होते.
साधारण ५ ते १० मिनिटांच्या बर्पीच्या व्यायामामुळे एका तासाच्या चालण्याइतकं किंवा त्यापेक्षा जास्त व्यायामाचे फायदे मिळू शकतात.
केटलबेल स्विंगमध्ये ताकद वाढवणारा व्यायाम आणि कार्डिओ व्यायाम या दोन्हींचा समावेश होतो. हा व्यायाम करताना पाय, कंबर, मांड्या, पाठीचा खालचा भाग आणि पोटाचे स्नायू काम करतात. या व्यायामामुळे स्नायूंची ताकद आणि त्यांची जास्त वेळ काम करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. शरीराचा पोश्चर सुधारण्यासही मदत होते.
HIIT हा सध्या लोकप्रिय असलेला व्यायामाचा प्रकार आहे. यामध्ये काही वेळ वेगाने व्यायाम केला जातो आणि त्यानंतर थोडा आराम किंवा कमी वेगाचा व्यायाम केला जातो. अशा पद्धतीने व्यायामाची तीव्रता कमी-जास्त केली जाते. २० मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळातही HIIT वर्कआउट करता येतो. HIIT करण्यासाठी जिममध्ये जाणं किंवा विशेष उपकरणं असणं आवश्यक नाही. घरच्या घरीही बॉडीवेट व्यायाम, जंपिंग जॅक्स, वेगाने धावणे आणि बर्पी यांचा वापर करून HIIT वर्कआउट करता येतो.
स्क्वॅट जंपमध्ये ताकद वाढवणारा व्यायाम आणि कार्डिओ यांचा एकत्रित व्यायाम होतो. यामध्ये मांडीचे पुढचे आणि मागचे स्नायू तसंच नितंबाचं स्नायू चांगले काम करतात. त्याचवेळी हृदयाची गतीही वाढते.
१० ते १५ मिनिटे स्क्वॅट जंप केल्याने १० हजार पावलं चालण्यापेक्षा जास्त कॅलरी खर्च होऊ शकतात. तसंच पायांची ताकद वाढवण्यासही या व्यायामाची मदत होते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.