काही लोकांना कायम रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. पण सतत रात्री जागून काम करण्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होऊ शकतो. एका नव्या संशोधनातून ही बाब समोर आलीये. जे लोक नेहमीच नाईट शिफ्टमध्ये काम करतात. त्यांच्या हृदयाच्या रचनेत काही बदल दिसून आल्याचं तज्ज्ञांना जाणवलं.
एवढंच नाही, तर त्यांच्या रक्तातही हृदयाच्या आजारांशी संबंधित काही बदल आढळलेत. तब्बल 42 हजार 671 लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आलाय. हे संशोधन 'युरोपियन हार्ट जर्नल' या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
या संशोधनासाठी एकूण 42 हजार 671 लोकांच्या आरोग्याची माहिती तपासण्यात आली. यामध्ये 1 हजार 322 लोक असे होते, जे नेहमी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत होते. या सर्वांचं सरासरी वय 52 वर्ष होतं.
संशोधनात सहभागी असलेल्या सर्व लोकांच्या हृदयाच्या तपासण्या करण्यात आल्या. यावेळी नियमित नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांच्या हृदयाच्या रचनेत काही बदल दिसून आले. त्यांच्या हृदयाच्या स्नायूंच्या नेहमीपेक्षा जाड झाल्याचं आढळलं. त्याचप्रमाणे हृदयाच्या आतील काही भागांचा आकारही काहीसा लहान झाला होता. पण हृदयाची रक्त पंप करण्याची एकूण क्षमता यामध्ये फारसा फरक दिसून आला नाही.
रात्री जागून काम केल्यामुळे शरीराचं शेड्यूल बिघडू शकतं. याचा परिणाम रक्तदाब, रक्तातील साखर आणि शरीरातील चरबीच्या प्रमाणावर होऊ शकतो. त्यामुळे दीर्घकाळ नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांना हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
पण हा धोका प्रामुख्याने कायम रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये अधिक दिसून आला आहे. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस रात्रीची ड्युटी करणाऱ्या लोकांच्या हृदयावर गंभीर परिणाम होत असल्याचं या संशोधनात आढळलेलं नाही.
या संशोधनाचे लेखक डॉ. मुवेई ली यांनी सांगितलं की, रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या हृदयाच्या रचनेत काही बदल नक्कीच दिसून आले आहेत. पण यावरून रात्री काम केल्यामुळे थेट हृदय खराब होतं, असं म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे नाईट शिफ्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयाच्या रचनेत असे बदल होतीलच, असं नाही. कायम रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो. पण याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणखी संशोधन होणं गरजेचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.