'उडान' (Udaan Serial) फेम अभिनेत्री कविता चौधरी (Kavita Chaudhary) यांच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे. कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. दूरदर्शनच्या 'उडान' या लोकप्रिय मालिकेत आयपीएस अधिकारी कल्याणी सिंह यांची भूमिका साकारून कविता यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. अमृतसर येथील रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे चाहत्यांना धक्का बसला असून ते सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त करत आहेत.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कविता चौधरीचा बॅचमेट असलेला अभिनेता अनंग देसाई यांनी सांगितले की, गुरुवारी रात्री कविता चौधरी यांच्या निधनाचे वृत्त समोर आले. कविता चौधरी यांचे पुतणे अजय सायल यांनी सांगितले की, 'गेल्या तीन-चार दिवसांपासून कविता चौधरी यांना अमृतसरमधील पार्वतीदेवी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण गुरुवारी रात्री 8.30 वाजता उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.'
कविता चौधरी यांच्या पार्थिवावर अमृतसर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कविता चौधरी गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर दीर्घकाळ उपचार देखील सुरू होते. 1989 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या 'उडान' मालिकेमध्ये कविता चौधरी यांनी आयपीएस अधिकारी कल्याणी सिंहची भूमिका साकारली होती. या मालिकेचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. ही मालिका त्यांची बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होती. ज्या किरण बेदींनंतर दुसऱ्या आयपीएस अधिकारी झाल्या होत्या.
कविता यांनी आपल्या करिअरमध्ये कविताने 'युअर ऑनर' आणि 'आयपीएस डायरीज' सारख्या मालिकांची निर्मिती केली आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात प्रसिद्ध सर्फ जाहिरातींमध्ये ललिताजींची भूमिका साकारल्यामुळे कविता यांना ओळख मिळाली. या जाहिरातीमध्ये त्यांनी एका हुशार गृहिणीची भूमिका साकारली होती. जी नेहमीच आपले पैसे खर्च करताना योग्य निवड करत असे. या जाहिरातीमुळे त्या चर्चेत आल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.