Diljit Dosanjh Concert: पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या गाण्यांची क्रेझ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येने चाहते उपस्थित राहतात. मात्र, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमात मुंबई पोलिसांनी नव्याने सुरू केलेल्या 'अँटी-ड्रग फॉरेन्सिक वाहनाच्या' मदतीने तरुणांची अमली पदार्थ सेवनाबाबत तपासणी केली. यामध्ये तपासणी करण्यात आलेल्या सुमारे ४० जणांपैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कॉन्सर्टदरम्यान अमली पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये सुमारे ४० तरुणांची ड्रग्ज सेवनाबाबत तपासणी केली. यामध्ये दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, पॉझिटिव्ह आढळलेल्या दोघांपैकी एक केनियाचा नागरिक असून दुसरा भारतीय आहे. या दोघांनी नेमके कोणते अमली पदार्थ सेवन केले आणि त्यांना हे पदार्थ कुठून मिळाले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
काय आहे मुंबई पोलिसांचे अँटी-ड्रग फॉरेन्सिक वाहन?
अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले 'अँटी-नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन अँड फॉरेन्सिक व्हॅन' सुरू केले आहे. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वाहनाचे उद्घाटन करण्यात आले होते. या वाहनाच्या माध्यमातून संशयास्पद पदार्थांची प्राथमिक तपासणी, नमुने गोळा करणे आणि घटनास्थळाचे फोटो तसेच व्हिडिओ पुरावे जमा करणे शक्य होते. मोठ्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे वाहन महत्त्वाचे ठरत आहे.
धमकीच्या ईमेलमुळे कॉन्सर्टमध्ये कडक सुरक्षा
दिलजीतच्या कॉन्सर्टला धमकीचा ईमेल मिळाल्यामुळे पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. या ईमेलमध्ये कॉन्सर्टचे ठिकाण, महापौर कार्यालय आणि मेट्रो स्थानकांवर स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे बॉम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली. कार्यक्रमासाठी ५०० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आले होते. तसेच श्वान पथक, अँटी-नार्कोटिक्स सेल आणि साध्या वेशातील पोलिसांचीही मदत घेण्यात आली. रेसकोर्सच्या आसपास ५०० ते ७०० मीटरचा परिसर नो-कार झोन घोषित करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.