'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरीला (Jui Gadkari) चांगली पसंती मिळत असून सध्या टीआरपीच्या शर्यतीमध्ये ही मालिका टॉपवर आहे. 'ठरलं तर मग' ही सध्या प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेमध्ये येण्यापूर्वी जुई गडकरी अनेक वर्षे मनोरंजनसृष्टीपासून दूर होती. जुई गडकरीला गंभीर आजार झाला होता. जई गडकरीने नुकताच एका मुलाखतीमध्ये या आजारावर कशी मात केली आणि तिला आलेल्या धक्कादायक अनुभवाचा खुलासा केला आहे.
जुई गडकरीने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी जुईला तिच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळाबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना जुई गडकरीने तिला झालेल्या गंभीर आजाराविषयी सांगितले. या आजारावर तिने कशी मात केली आणि यावेळी तिला कशापद्धतीचे अनुभव आले हे तिने सांगितले. जुई गडकरीने उत्तर देताना सांगितलं की, 'वयाच्या 27 व्या वर्षी मला डॉक्टरांनी सांगितलं की तू आई होऊ शकणार नाहीस. डॉक्टरांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मी एकटीच होते. त्यानंतर त्यांनी मला आईला बोलवून घ्यायला सांगितलं. तेव्हा मी 'पुढचं पाऊल' या मालिकेत काम करत होती. या मालिकेत कल्याणीला मूलं होणार हा ट्रॅक सुरु होता. एकीकडे माझ्या खऱ्या आयुष्यात बाळ होणार नाही आणि दुसरीकडे ऑनस्क्रीन मला आईची भूमिका साकारायची हे सर्व माझ्यासाठी खूप कठीण होतं.'
जुई गडकरीने पुढे सांगितले की, 'मानसिकदृष्ट्या मी खचले होते. माझे बरेच अवयव डॅमेज झाले होते. जेव्हा मला हे कळालं तेव्हा मला खूप त्रास झाला. त्यावेळी माझी बरीच कामही सुरु होती. एवढ्या कमी वयात आपलं शरीर जेव्हा अशक्त होतं तेव्हा आपण मानसिकदृष्ट्याही खचतो. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या कामावरही व्हायला लागला होता. माझे डान्स शोही कॅन्सल झाले.'
तसंच, 'मानसिकदृष्ट्या मी खूपच खचले होते. माझा मणका डिजनरेट झाला होता. पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्युमर झाला होता. त्यामुळे मी आई होऊ शकत नाही, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती. सुरुवातीला माझं फक्त डोकं दुखायचं, माझा थायरॉइड वाढला होता. व्हर्टिगोचा त्रास सुरू झाला. मला आडवं होऊन झोपता येत नव्हतं. अनेक रात्र, बरेच महिने मी बसून झोपायचे. पुढे माझं वजन वाढलं. मासिक पाळीत अडचणी येऊ लागल्या. नंतर डॉक्टरांनी माझ्या ब्लड टेस्ट केल्यावर कळालं की RA+ (rheumatoid arthritis) हा आजार मला झाला आहे. या आजारामध्ये तुमची इम्युन सिस्टिम शरीरातील चांगल्या टिश्यूंवर अटॅक करते.'
यावेळी जुई गडकरीने आपल्या चाहत्यांना विनंती देखील केली, 'मला हा आजार ७ वर्षांनंतर कळाला. त्यामुळे हा आजार असणाऱ्यांना मी विनंती करते की, त्यांनी रोज सकाळी उठून थोडे तरी सूर्यनमस्कार करावे. योगामुळे माझी शारीरिक क्षमता वाढली, रक्ताभीसरण सुधारलं. मी सलग २ ते ३ वर्षे या सर्व गोष्टीसाठी दिले. त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी जीममध्ये जाऊन वजन उचलण्याची गरज नसते. मी आहारामध्ये देखील बदल केले. यासाठी अध्यात्मिकाचीही जोड हवी असते.'
त्यासोबतच, 'आपल्या समाजात स्त्रीला मुलबाळ झाल्यावरच ती पूर्ण होते असा समज आहे. पण ज्या महिलांना बाळ होऊ शकत नाही त्यांनी काय करायचं? त्या स्त्रिया नाहीत का? तिच्यात मातृत्व नाही का? मला आज अनेक लोक म्हणतात वयाची 35 वर्षे पार केलीस आता कधी लग्न करणार? पण माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. त्यामुळे मला फरक पडत नाही. आता माझे रिपोर्ट सकारात्मक येत असून भविष्यात मी जुळ्या मुलांची आई होऊ शकते.', असे जुई गडकरीने यावेळी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.