South Superstar Rajinikanth:
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची फॅन फॉलोइंग किती मोठी आहे हे सांगण्याची गरज नाही. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातही रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. कधी त्याचे चाहते रजनीकांतला दुधाचा अभिषेक करतात तर कधी त्यांच्या वाढदिवसाला एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात. रजनीकांत यांचा एक चाहता चर्चेत आला आहे. यामागचे कारण म्हणजे या चाहत्याचे अभिनेत्यावर इतके प्रेम आहे की त्याने चक्क रजनीकांत यांचे मंदिर (Rajinikanth Temple) घरामध्ये बांधले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रजनीकांतच्या एका जबरा फॅनने तमिळनाडूतील मदुराईतील आपल्या घरामध्ये अभिनेत्याचे मंदिर बांधले आहे. या मंदिरामध्ये त्याने तब्बल २५० किलोची मूर्ती बसवली आहे. स्वत:ला रजनीकांतचा मोठा चाहता म्हणणाऱ्या कार्तिक यांनी आपल्या घरातील एका खोलीमध्ये मंदिर बांधलं आहे. सध्या रजनीकांत यांचा चाहता कार्तिकचीच सगळीकडे चर्चा होत आहे.
कार्तिकने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितले की,'माझे संपूर्ण कुटुंब रजनीकांत यांचे चाहते आहेत. माझ्यासाठी रजनीकांत हे देव आहेत. मी त्यांचा आदर म्हणून घरामध्ये मंदिर बांधलं आहे. मी रजनीकांत वगळता इतर कोणत्याही अभिनेत्याचे चित्रपट पाहत नाही.' तर कार्तिक यांच्या मुलीने सांगितले की, 'आम्ही रजनीकांत यांच्या मूर्तीची पूजा तशाच पद्धतीने करतो. जसं आपण मंदिरामध्ये देवाची पूजा करतो.'
दरम्यान, रजनीकांत 'जेलर'च्या यशाचा आनंद घेत आहेत. 'जेलर'मध्ये ते एका अशा व्यक्तीची भूमिका साकारली आहे ज्याला आपल्या पोलिस मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे. या चित्रपटामध्ये मोहनलाल, शिवराजकुमार आणि जॅकी श्रॉफ महत्त्वपूर्ण कॅमिओमध्ये दिसले होते.
येत्या काही महिन्यांत ते अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'थलायवर 170'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'थलायवर 170'चे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल करत आहेत. बिग बी आणि रजनीकांत यांनी 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम' चित्रपटात एकत्र काम केले होते. तब्बल ३२ वर्षांनंतर हे सुपरस्टार 'थलायवर 170' या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकत्र काम करणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.