पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक महिला स्वतःचं अस्तित्व आणि ओळख निर्माण करतात. शिक्षण, व्यवसाय अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. परंतु देशामध्ये अनेक भागांमध्ये महिलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अनेक भागांमध्ये कौटुंबिक हिंसाचार, महिलांवरील अत्याचार आणि रात्रीच्या वेळी नराधमांकडून छेडछाड अशा अनेक घटना घडत असतात. परंतु, भीतीपोटी महिला त्यावर आवाज उठवत नाहीत. कोलकाताच्या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक क्षेत्रातून त्यावर चीड व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनंही एक संतप्त पोस्ट लिहिली आहे.
सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असतो. अनेक मुद्द्यांवर तो भाष्य करत असतो. सिद्धार्थ इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून अनेकवेळा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो आणि त्याचे मजेशीर व्हिडिओ देखील पोस्ट करत असतो. पण काल सिद्धार्थनं केलेली पोस्ट झणझणीत आहे. त्यामागे कमालीची चीड दिसत आहे. कोलकाताच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर त्यानं भाष्य केलं आहे. अनेक गंभीर मुद्दे त्यानं उपस्थित केले आहेत.
सिद्धार्थच्या पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलं की, ''मुलगी शिकते, पण तिला शिकू दिले जात नाही, ती प्रगती करण्यासाठी धडपड करते, पण तिची प्रगती होऊ देत नाहीत''. सिद्धार्थने या व्हिडिओच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेवर सडेतोड भाष्य केले आहे.
त्याच्या पोस्ट केलेल्या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांनी प्रचंड व्हायरल केलं आहे. सिद्धार्थने ''Sorry भारत 'माते'! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही ! हा Independence Day तुझ्यासाठी Happy नाही. क्षमा'' असेही त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
Edited By: Nirmiti Rasal