महाराष्ट्राच्या लोककलेचा इतिहास लिहिताना काही कलाकारांची नावं सुवर्णाक्षरांनी लिहावी लागतात. आपल्या अभिनयाने, नृत्याने आणि दमदार अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशाच एक महान कलाकार म्हणजे विठाबाई नारायणगावकर. तमाशा आणि लावणी या लोककलांना वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करत त्यांनी कलेशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. कुटुंब, संसार आणि व्यावसायिक आयुष्य यांचा समतोल साधताना त्यांनी तमाशा कलेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केलं. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्याग आणि कलेवरील निष्ठेची कहाणी आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. ही कहाणी आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या 'ईठा' (Eetha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म १ जुलै १९३५ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला. त्यांचं संपूर्ण कुटुंब तमाशा कलेशी जोडलेलं होतं. त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी स्वतःची फिरती तमाशा फडाची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर त्यांचे वडील भाऊ-बापू नारायणगावकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी ही कला पुढे नेली.लहानपणापासूनच विठाबाईंना लावणी, गवळण आणि तमाशातील विविध कलाप्रकार जवळून पाहायला मिळाले. त्यामुळे अभिनय आणि नृत्याचं कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्यांनी प्रत्यक्ष फडावरूनच कलेचे धडे गिरवले. गावोगावी जाऊन सादरीकरण करताना त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यांच्या नैसर्गिक अभिनयशैलीने आणि रंगमंचावरील उपस्थितीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
विठाबाई नारायणगावकर यांचं आयुष्य सुरुवातीपासूनच अनेक संघर्षांनी भरलेलं होतं. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी तमाशाच्या फडात काम करण्यास सुरुवात केली आणि बालपण बाजूला ठेवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावला. moneycontrol च्या वृत्तानुसार, वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. एका व्यक्तीकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा उल्लेख त्यांच्या जीवनकथेत आढळतो. या घटनेचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. मात्र, या कठीण प्रसंगांमुळे त्या खचून गेल्या नाहीत. उलट आपल्या कलेलाच त्यांनी ताकद बनवलं. गायन, अभिनय आणि नृत्याच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आणि पुढे तमाशा क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
विठाबाईंच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ज्येष्ठ मराठी नाटककार मामासाहेब वरेरकर यांच्याशी झालेली भेट. त्यांचा तमाशातील अभिनय पाहून मामासाहेब प्रभावित झाले. त्यांनी विठाबाईंना आपल्या नाट्यसंघासोबत काम करण्याची संधी दिली.या संधीमुळे त्यांना अभिनयातील बारकावे समजून घेता आले. रंगमंचावर सादरीकरण कसं करावं, प्रेक्षकांशी संवाद कसा साधावा आणि आपल्या कलेत अधिक प्रभावीपणा कसा आणावा, याचा अनुभव त्यांना मिळाला. पुढे त्यांच्या अभिनयाची आणि नृत्याची लोकप्रियता वाढत गेली. ग्रामीण भागापासून ते शहरी नाट्यरसिकांपर्यंत त्यांची ओळख निर्माण झाली.
रंगमंचावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या विठाबाईंचं वैयक्तिक आयुष्य मात्र अनेक अडचणींनी भरलेलं होतं. त्यांच्या वैवाहिक आयुष्यातही अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. मराठी नाटककार आणि दिग्दर्शक शांतनू घुले यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'विठा' हे नाटक सादर केलं होतं. या नाटकामध्ये विठाबाई आणि त्यांचे पती मारुती सावंत यांच्या नात्यातील तणाव दाखवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पतीकडून त्यांच्या कमाईवर नियंत्रण ठेवले जात असल्याचे आणि त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही या नाटकातून मांडण्यात आले. त्यामुळे कलेच्या क्षेत्रात मोठं यश मिळवूनही वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला.
विठाबाईंच्या आयुष्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला प्रसंग त्यांच्या मातृत्वाशी संबंधित आहे. विठाबाई नऊ महिन्यांच्या गर्भवती असताना तमाशाच्या फडावर सादरीकरण करत होत्या. त्याचवेळी त्यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्या रंगमंचामागे गेल्या आणि तिथेच त्यांनी बाळाला जन्म दिला. इतकंच नाही, तर दगडाच्या साहाय्याने नाळ कापून त्या पुन्हा रंगमंचावर जाण्यासाठी तयार झाल्या.हा प्रकार समजल्यानंतर प्रेक्षकांनीच कार्यक्रम थांबवण्याची मागणी केली आणि त्यांना विश्रांती घेण्याचा आग्रह केला. कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि कामावरील समर्पण दाखवणारा हा प्रसंग आजही त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक चर्चेच्या घटनांपैकी एक मानला जातो.
विठाबाईंचं योगदान केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नव्हतं. १९६२ मध्ये भारत आणि चीन यांच्यात युद्ध सुरू असताना त्यांनी भारतीय जवानांसाठी विशेष तमाशाचे कार्यक्रम सादर केल्याचं सांगितलं जातं. ईशान्य सीमावर्ती भागातील जवानांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांनी विशेष कार्यक्रम केले होते.याशिवाय तमाशा कलाकारांच्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीबाबतही त्यांना विशेष काळजी होती. या कलाकारांना आर्थिक सुरक्षितता मिळावी आणि त्यांच्या कलेला योग्य सन्मान मिळावा, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
विठाबाई नारायणगावकर यांनी तमाशा कलेसाठी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण कायम राहावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये त्यांच्या नावाने 'विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार' सुरू केला.हा पुरस्कार तमाशा कलेच्या जतन आणि संवर्धनासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना प्रदान केला जातो. त्यामुळे नव्या पिढीतील कलाकारांनाही पारंपरिक लोककलेचं महत्त्व समजण्यास मदत होते. आजही महाराष्ट्राच्या लोककलेचा, तमाशाचा आणि लावणीचा इतिहास सांगताना विठाबाई नारायणगावकर यांचं नाव आदराने घेतलं जातं.
संपूर्ण आयुष्य रंगमंचावर गाजवणाऱ्या विठाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मात्र आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. १५ जानेवारी २००२ रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वेळी कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.