

अनेक जोडपी बाळासाठी प्रयत्न करत असतात. पण वारंवार प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तर मासिक पाळीतील अनियमितता, स्त्रीबीजांची गुणवत्ता किंवा पुरुषांच्या शुक्राणूंची तपासणी केली जाते. पण गर्भधारणेत अडथळा येण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण असू शकतं. ते म्हणजे रक्तातील साखरेचं वाढलेलं प्रमाण. त्यामुळे बाळाचं नियोजन करताना केवळ प्रजनन आरोग्याचीच नव्हे, तर रक्तातील साखरेची पातळीही तपासणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
अंधेरीतील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता चौधरी यांनी सांगितलं की, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं किंवा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे महिलांच्या ओव्ह्युलेशन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. तर पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.
इन्सुलिन हे शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारं हार्मोन आहे. पण इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यास शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करावं लागतं. शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढल्याने हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम होतो.
यामुळे महिलांमध्ये अंडोत्सर्गाच्या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये ही समस्या सामान्यपणे आढळते. यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, अंडोत्सर्ग वेळेवर न होणे आणि गर्भधारणेत अडचणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
गर्भधारणेसाठी केवळ महिलांनीच नव्हे, तर पुरुषांनीही आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असल्यास शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो. तसेच टेस्टोस्टेरॉन या पुरुष संप्रेरकाच्या पातळीवरही परिणाम होऊ शकतो.
यामुळे शुक्राणूंची संख्या, त्यांची हालचाल आणि डीएनएच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसल्यास शरीरातील रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंनाही नुकसान पोहोचू शकतं. या सर्व गोष्टींचा नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होण्याच्या शक्यतेवर परिणाम होऊ शकतो.
बाळाचे नियोजन करताना महिला आणि पुरुष या दोघांच्याही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असणे गरजेचे आहे. महिलांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्समुळे अंडोत्सर्ग आणि हार्मोन्सच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. पीसीओएस असलेल्या महिलांनी याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. तर पुरुषांमध्ये मधुमेह आणि शरीरातील चयापचयाशी संबंधित समस्यांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता आणि लैंगिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
अनेक जोडपी गर्भधारणेत अडचण येत असल्यास केवळ प्रजननाशी संबंधित तपासण्या करतात. पण शरीरातील साखरेची पातळी आणि इतर चयापचयाशी संबंधित समस्यांची तपासणीही करणं आवश्यक आहे. यामुळे गर्भधारणेत अडथळा आणणारी काही कारणं वेळीच समजू शकतात. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास आरोग्य सुधारण्यास आणि गर्भधारणेसाठी शरीर अनुकूल होण्यास मदत होते.
दैनंदिन जीवनातील काही सवयींमुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढू शकतो. आहारात गोड पदार्थ आणि मैद्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे प्रमाण जास्त असणं, शारीरिक हालचाली कमी असणं, पुरेशी झोप न घेणं आणि वजन वाढणं ही त्यामागील काही प्रमुख कारणं आहेत.
एखाद्या व्यक्तीला मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स आहे म्हणजे तिला गर्भधारणा होऊ शकत नाही, असं नाही. गर्भधारणेची शक्यता ही व्यक्तीचं एकूण आरोग्य, मधुमेह किती नियंत्रणात आहे आणि इतर वैद्यकीय समस्यांवर अवलंबून असते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.