संध्याकाळ झाली की सासू- सुना, सासरे किंवा सगळं कुटुंब एकत्र बसून मालिका पाहतं. हे दृश्य आजही अनेक घरांमध्ये पाहायला मिळतं. यामध्ये काही मंडळी यापात्रांना खरं समजतात आणि तशाच प्रतिक्रीया द्यायला लागतात. काहींना पुढे काय होणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशीच एक मालिका सध्या लोकांच्या चर्चेत आहे. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. ही मालिका एक वेगळं वळण घेत आहे. याचं कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेल्या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं सावलीच्या आवाजाचं सत्य अखेर जगासमोर येताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये वझे मायलेकींच्या खोटेपणाचा पर्दाफाश होत असल्यामुळे प्रेक्षक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.
नवीन प्रोमोमध्ये तारा स्टेजवर गाण्याचा परफॉर्मन्स सादर करत असते. मात्र परफॉर्मन्स सुरू असतानाच अचानक मागचा दरवाजा उघडतो आणि सर्व प्रेक्षकांच्या नजरेसमोर सावली स्वतःच्या आवाजात गाणं गाताना दिसते. त्या क्षणी ताराचं गाणं फक्त लिपसिंक असल्याचं स्पष्ट होतं आणि इतके दिवस सावलीचा आवाज वापरून तारा प्रसिद्धी मिळवत असल्याचं सत्य सर्वांसमोर उघड होतं.
यानंतर सारंग सावलीला घेऊन थेट रंगमंचावर येतो आणि तीच खरी गायिका असल्याचं जाहीर करत जगासमोर तिची ओळख करून देण्याचं आव्हान देतो. याच दरम्यान सावली आपल्या हातात बांधलेला वचनाचा धागा काढून भैरवी वझेच्या हातात देते आणि आता मी या बंधनातून मुक्त झाले आहे, असं सांगते. सर्वांसमोर झालेला हा अपमान भैरवीला सहन होत नाही आणि ती तिथून निघून जाते.
या प्रोमोमुळे येणाऱ्या भागांबाबत प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. आता भैरवी सावलीचा बदला घेणार का? सारंगची आई सावलीच्या आवाजाचं सत्य स्वीकारून तिला गायन क्षेत्रात साथ देणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हा प्रोमो पाहून नेटकरीही प्रचंड आनंद व्यक्त करत आहेत. या प्रोमोच्या व्हिडीओचा कमेंट बॉक्स प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनी भरलेला पाहायला मिळेल. सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एकूणच ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेने प्रेक्षकांना महत्वाचा क्षण दाखवत पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरवला आहे. आगामी भागांमध्ये कथा कोणतं वळण घेणार? हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.