मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या जीवनावर आधारित संघर्षयोद्धा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित 'संघर्षयोद्धा' हा चित्रपट (Sangharsh Yodha Movie) येत्या २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझरनंतर पहिलं गाणं 'उधळीन जीव...' (Udhalin Jeev Song) रिलीज करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध 'संघर्षयोद्धा - मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या टीजरला अफाट प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आले आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात 'उधळीन जीव...' हे हृदयस्पर्शी गाणं रिलीज झाले असून त्याला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. २६ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
'उधळीन जीव...' या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. वैभव देशमुख यांचे भावगर्भ शब्द, विजय गवंडे यांचं अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल.
'संघर्षयोद्धा' या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी या चित्रपटाचं लेखन आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटीलने साकारली आहे. यासोबतच या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर , सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.