Nitin Desai Death Latest Update: मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर आघात करणारी घटना घडली. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. कला दिग्दर्शनाची दैवी देणगी लाभलेल्या नितीन देसाई यांनी अचानकपणे इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली.
नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली? हे अद्यापही कळू शकलं नाही. मात्र, प्राथामिक माहितीनुसार, देसाई यांच्या एनडी स्टुडिओवर जप्तीच्या कारवाईची टांगती तलवार होती. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा होता. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबईतील एका कंपनीने त्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली असल्याचं कळतंय. यावर अद्याप निर्णय झालेला नसून या जप्तीच्या कारणामुळे देसाई यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे.
दरम्यान, साम टीव्हीने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नसल्याने या जप्तीबाबत अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. २००५ मध्ये नितीन देसाईंनी मुंबईजवळील कर्जत येथे ५२ एकर (२१ हेक्टर) मध्ये पसरलेला एनडी स्टुडिओ सुरु केला.
लगान, देवदास, जोधा अकबर, प्रेम रतन धन पायो या चित्रपटांचे सेट त्यांनी तयार केले होते. त्याचबरोबर बालगंधर्व, हरिश्चंद्राची फॅक्टरी, यासारख्या अनेक चित्रपटासाठी त्यांनी सेट तयार केले होते. नितीन देसाई यांच्या अचानक निघून जाण्याने सिनेसृष्टीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.