मुंबई: ‘हर हर महादेव’ (Marathi Entertainment News) अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या (Bollywood) ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच अवघ्या काही क्षणात लाखोंनी व्ह्युज मिळाले आहेत. सोमवारी रात्री या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाचा सोहळा मुंबईत पार पडला. केवळ मराठीच नाही तर इतर भाषेतील ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुबोध भावे यांनी अतिशय समंजसपणे साकारलेली शिवाजी महाराजांची करारी बाण्याची भूमिका, दमदार व्यक्तिमत्व असलेल्या शरद केळकर यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडेंच्या भूमिकेचे दर्शन या ट्रेलरमधून होत आहे. या दोन्ही अभिनेत्यांना प्रेक्षकांनी आपल्या पसंतीची पोचपावती दिली आहे. (Marathi Actors) (Marathi Actress)
अंगावर शहारा आणणाऱ्या लढाईचे दृश्य आणि सोबतच त्याच ताकदीच्या संवादांनी विस्मयकारक अनुभव दिल्याच्या प्रतिक्रिया अनेकजण समाजमाध्यमांवर देत आहेत. अभिजीत देशपांडेंच्या लेखन- दिग्दर्शनातून तयार झालेला आणि सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेला ‘हर हर महादेव’ येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला मराठीसह हिंदी, तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमधून भारतभरात प्रदर्शित होणार आहे. सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग ऍन्ड फिल्म्स आणि झी स्टुडियोजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच मुंबईत पार पडला. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते सुबोध भावे याप्रसंगी म्हणाले की, " 'हे स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा' असं आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याप्रमाणेच मी ही भूमिका साकारावी, ही माझी किंवा दिग्दर्शकाची नाही तर प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती असं माझं मत आहे.
बावीस वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईत आलो होतो, स्ट्रगल करत होतो त्यावेळी एका मालिकेसाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडीशन दिली होती. त्यावेळी माझी निवड झाली नाही. महाराजांची ही भूमिका करण्यासाठी मला तब्बल २२ वर्षे वाट बघावी लागली. कदाचित महाराजांचीच ही इच्छा असेल की, मी माणूस म्हणून अजून प्रगल्भ व्हावं, अभिनेता म्हणून या भूमिकेसाठी अधिक तयार व्हावं, म्हणूनच एवढ्या कालावधीनंतर ही भूमिका माझ्याकडे आली. या भूमिकेला मी पूर्णपणे समर्पणाची भावना दाखवली म्हणूनच ती साकारणं शक्य झालं.”
हर हर महादेव चित्रपटाच्या कथेबद्दल लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तिमत्वाचा विचार करताना मला एका गोष्टीचं कायम कुतुहल वाटायचं की, महाराजांमध्ये नेमकी अशी काय गोष्ट होती ज्यासाठी हजारो मावळे आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्यासाठी लढायचे. यावर अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती ही की, हे केवळ एक राजा आणि त्याचं सैनिक एवढंच नातं नव्हतं.
हे नातं होतं माय माऊलीचं आणि तिच्या लेकराचं महाराजांच्या व्यक्तिमत्वातली हीच गोष्ट मला भावली. ‘हर हर महादेव’ ही केवळ लढाई किंवा पराक्रमाची गोष्ट नाहीये तर ती जाणत्या राजाचं त्याच्या रयतेवर, शिलेदारांवर असलेल्या विश्वासाची आणि प्रेमाची गोष्ट आहे. या भावना वैश्विक आहेत त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक भाषेतील प्रेक्षकांना मनापासून भावेल, असा विश्वास मला आहे.”
हर हर महादेव या चित्रपटात पडद्यावर ज्याप्रमाणे कसलेल्या कलाकारांची टीम आहे त्याचप्रमाणे पडद्यामागेही तेवढ्याच कसलेल्या तंत्रज्ञांच्या टीमने यावर काम केलंय. यातील सर्व कलाकारांच्या लूक डिझाईनचे काम केले आहे प्रसिद्ध रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी तर वेशभूषेची बाजू सांभाळली आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते नचिकेत बर्वे यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांसाठी छायालेखन करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते डीओपी त्रिभुवन बाबू सदिनेनी यांनी ‘हर हर महादेव’चे छायादिग्दर्शन केले आहे.
हितेश मोडक यांचे जबरदस्त संगीत असलेल्या या चित्रपटाची गीते मंदार चोळकर आणि मंगेश कांगणे यांनी लिहिली आहेत. झी स्टुडियोजच्या वतीने येत्या २५ ऑक्टोबरला भारतभरात प्रदर्शित होणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी दिवाळीची विशेष भेट ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.