प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल
सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नोकरी देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. राज्य सरकारच्या उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये पतीला सरकारी नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत कल्याणमधील एका महिलेकडून 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप या दोघांवर आहे. कल्याण येथील सायली चव्हाण यांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या नोकरीसाठी पैसे घेण्याच्या या प्रकरणात सेंट्रल हॉस्पिटलमधील कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत. सायली चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार तिचे आई-वडील गायक आणि कलाकार आहेत. त्यामुळे निशा भगत आणि अनिल आहिरे यांचे त्यांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. दोघेही त्यांच्या कुटुंबासोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याने त्यांची कुटुंबाशी ओळख निर्माण झाली होती. चव्हाण यांनी आरोप केला की, या जवळच्या संबंधांचा फायदा घेत आरोपींनी कुटुंबाचा विश्वास संपादन केला.
विविध सरकारी विभागांमध्ये आपली ओळख असल्याचा त्यांनी सांगितलं होतं. त्याचा आधार घेत सरकारी नोकरीचे आमिष दाखवलं. त्यातून त्यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. आरोपींनी चव्हाण आणि त्यांच्या पतीला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलं होतं. मार्च ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत त्यांच्याकडून कथितपणे २० लाख रुपये घेण्यात आले. मात्र आश्वासन दिलेली नोकरी मिळाली नाही. तसेच वारंवार पैसे परत मागूनही आरोपींनी रक्कम परत करण्यास नकार दिला.
चव्हाण यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे पैशांच्या व्यवहाराचे पुरावे तसेच एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी नोकरी मिळवून देण्यासाठी पैशांच्या व्यवहाराबाबत चर्चा करताना दिसत असल्याचा त्यांचा आरोप आहे. निशा भगत यांनी सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दोन जागा रिक्त असल्याचे सांगितले होते . पैसे देऊन त्या जागांवर नोकरी मिळवून देता येईल, असा दावा केल्याचेही चव्हाण यांनी तक्रारीत म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.