Sonali Kulkarni News  Saam tv
मनोरंजन बातम्या

Sonali Kulkarni: 'पुरूषांची जात दिसली,त्या जातीचं नाव होतं...'; मणिपूर महिला अत्याचार प्रकरणावरून सोनाली कुलकर्णीने व्यक्त केला संताप

Sonali Kulkarni on Manipur Clashes: 'मणिपूरमधील घटनेत त्या पुरूषांची जात दिसली,त्या जातीचं नाव होतं नराधम, अशा शब्दात सोनाली कुलकर्णीने संताप व्यक्त केला.

Vishal Gangurde

Sonali Kulkarni News: मणिपूरमधील महिला विवस्त्र प्रकरणावरून देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी मणिपूरचा प्रश्न उचलून धरला आहे. मणिपूर महिला अत्याचार प्रकरणाचा सर्वच क्षेत्रातून निषेध केला जात आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी मणिपूरच्या घटनेचा निषेध केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फेसबुक करत मणिपूरच्या घटनेचा निषेध केला आहे.

'मणिपूरमधील घटनेत त्या पुरूषांची जात दिसली,त्या जातीचं नाव होतं नराधम, अशा शब्दात सोनाली कुलकर्णीने संताप व्यक्त केला. (Latest Marathi News)

मणिपूर महिला अत्याचार प्रकरणावरील सोनाली कुलकर्णीची फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

सोनाली कुलकर्णी म्हणाली, माझी मुलगी ११ वर्षाची आहे.. तिला सध्या सुट्टी आहे. सुट्टीत तिच्यासाठी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करत असतो.. त्यातली एक गंमत म्हणजे रोज वर्तमानपत्रातल्या ३-४ बातम्या तिने वाचायच्या..कला, क्रीडा, समाज, राजकारण, विज्ञान, विश्व, माणसं.. ह्याबाबत कितीतरी गोष्टी तिच्या कानावर पडतात, तिला सांगण्याच्या निमित्ताने आमची माहिती, स्मृती ताजी होते.. किती मजेत जाते सकाळ'.

'पण गेल्या आठवड्यापासून माझा थरकाप उडाला आहे.. मी आणि नचिकेत कावेरीपासून पेपर लपवतो आहोत.. एका लहान निरागस मुलीला आपल्या देशातली ही बातमी कुठल्या तोंडानं सांगू आम्ही..? की एका मोठ्या जमावाने दोन स्रियांना विवस्त्र करून हुल्लडबाजी करत, त्यांच्या शरिराला निंदनीय स्पर्श करत त्यांची धिंड काढली.. हा विकृत खेळ दिवसाढवळ्या झाला.. त्या असहाय्य स्त्रिया बचावासाठी पळत असताना कुठलाही समर्थ जबाबदार पुरूष त्यांना वाचवायला पुढे आला नाही, कुलकर्णी पुढे म्हणाली.

'स्त्रीवर परिस्थितीचा, इतिहासाचा सूड उगवू शकतो हे कोणी ठरवलं.. कोणी ठरवलं की स्त्री एक साधन आहे - तिचा आपण हवा तसा उपयोग करू शकतो.. तीव्र संताप येतोय तेचतेच लिहिण्याचा.. १० सेकंद एक व्हिडीओ पाहू शकले मी .. त्यात काहींनी त्या बायांना केलेले अक्षम्य क्रूर अश्लील स्पर्श दिसले.. त्यात त्या पुरूषांची जात दिसली - त्या जातीचं नाव होतं नराधम, असा संताप सोनालीने व्यक्त केला.

'साधा चुकून पाय लागला कोणाला तर चटकन नमस्कार करतो आपण.. परस्त्रीला मातेसमान मानतो आपण.. भारतीय संस्कार किती महान असतात म्हणतो आपण.. मग..? हे आहेत आपले संस्कार..? अब्रूचे धिंडवडे काढायला शिकवणारे..? बलात्कार झाल्यानंतर हौतात्म्य आणि सहानुभूती देणाऱे..? असा सवाल सोनाली कुलकर्णीने उपस्थित केला.

'आपल्या देशाच्या राष्ट्रपती एक महिला आहेत, मंगळावर यान पाठवणाऱ्या प्रामुख्यानं महिला शास्त्रज्ञ आहेत- ह्यासाठी अभिमान वाटून घेत असताना हे काय घडून बसलं.. सरकार, पोलीस, पत्रकार, समाजसेवक, न्यायव्यवस्था त्यांचं कर्तव्य करतीलंच.. आशा तरी ठेवूया.. गरज आहे ही मानसिकता बदलण्याची.. हे पुरूष बदलण्याची ! अशा गुन्ह्याला जबरदस्त दहशतीची शिक्षा सुनावण्याची - अशी सजा - जी ऐकून त्या झुंडीच नाही , तर कुणाच्याच पुढच्या सात पिढ्या मनातही पाप करू धजल्या नाही पाहिजेत, असा संताप सोनालीने व्यक्त केला.

'रडू येऊ नये म्हणून दात घट्ट मिटून ठेवले तरी डोळ्यातून घळघळ पाणी येतंय. जीव घाबरा होतोय.. रस्त्यावरच्या प्रत्येक मुलीबाळीला सुरक्षित घरी पोचवावंसं वाटतंय.. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, निर्वस्त्र देह कसाबसा हातांनी झाकून - धरणीमाते पोटात घे - असा मूक आक्रोशाचा भाव असलेल्या त्या दोघी मला पळताना दिसत आहेत.. कुठलं जनावरही असं पाशवी होताना ऐकलं नाहीए आपण, सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाली.

'माझ्या मुलीला जगाबद्दल काय चांगलं सांगू.. कोणालाच, कधीच अशा बातम्या वाचायला लागू नयेत.. पुष्यमित्र उपाध्यायांची कविताच अंगी बाणावी लागणार. आता प्रत्येकीला……सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो..अब गोविंद ना आयेंगे.., असेही सोनाली पुढे म्हणाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT