मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखला (Riteish Deshmukh) नुकताच 'महाराष्ट्राचा फेव्हरेट डायरेक्टर' हा पुरस्कार मिळाला. वेड चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचा हा चित्रपट खूपच सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाने बक्कळ कमाई देखील केली. अशातच आता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुखने (Genelia Deshmukh) त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करत माहिती दिली. रितेश देशमुख या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच चित्रपटामध्ये काम देखील करणार असल्याचे बोलले जात आहे. रितेश देशमुखचा हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. दोघांनी देखील राजा शिवाजीचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. मुबंई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर स्वत: रितेश देशमुख हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणार आहे.
या चित्रपटातील संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे छायांकन संतोष सिवल हे करणार आहेत. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोण दिसणार आहे आणि इतर स्टारकास्ट कोण असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.
रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिली. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.'
रितेश देशमुखने या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती. एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….'राजा शिवाजी’' रितेश देशमुखच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांकडून पसंती मिळत असून ते त्याला नव्या चित्रपटासाठी शुभेच्छा देत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.