'श्री फॅमिली गाईड' (Shree Family Guide) प्रोग्रॅमच्या माध्यमातून नवी मुंबईतल्या (Navi Mumbai) वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे १८ संत-महात्म्यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या 'श्रीगुरू पादुका दर्शन' उत्सवाला (Shriguru Paduka Darshan Program) मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सोहळ्याला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी उपस्थिती लावत संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी नामस्मरण आणि भक्तिमार्गासोबतच संतांच्या शिकवणीचे महत्व सांगितलं. 'समाजाची घट्ट बांधणी ही संत परंपरेमुळे झाली.' असल्याचं यावेळी त्यांनी सांगितले.
मनोज जोशी यांनी यावेळी सांगितले की, 'आपल्या महाराष्ट्राला संताची अद्भूत परंपरा लाभली आहे. अशी तर संपूर्ण भारतामध्ये संत परंपरा हजारो वर्षांपासून आपल्याला लाभली आहे. आपल्या संस्कृतीची आणि धर्माची मुळं घट्ट करण्याचे काम संत परंपरेने केले आहे. सामाजिक बांधिलकी, सामाजिक ऐकोपा आणि समाजाची नीट घट्ट बांधणी जी कोणी केली असेल ती म्हणजे आपल्या या महान संत परंपरेने केली आहे. अगदी १८ पगड जातींमध्ये प्रत्येक ठिकाणी संत जन्माला आले आहेत. या संतानी देखील हेच काम केले आहे.'
संतांच्या कार्याचे महत्व सांगताना मनोज जोशी म्हणाले की,'आज आपल्याला अनेक मुलं सापडतात जी डिप्रेशनमध्ये आहेत. ज्यापद्धतीने आपण फक्त पैशाच्या मागे धावत आहोत. आताच्या घडीलासुद्धा आपल्याला या संताची आवश्यकता खूप आहे. हे आजच्या पिढीने जाणून घेण्याची गरज आहे. कोणत्याही सायक्रॅटिस्टकडे जाण्याची गरज नाही तर खऱ्या अर्थाने हे संत खरे सायक्रॅटिस्ट आहेत. खऱ्या अर्थाने या संतांनी लोकांची डोकी फिरवू न देण्याकरता नाम स्मरणाच्या माध्यमातून म्हणा किंवा भक्तीमार्गातून म्हणा उपदेश दिले. संत एकनाथांपासून ते संत नामदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत सोपान अशा किती तरी संतांची एकच शिकवण होती. वेळ प्रसंगी त्यांनी दांडक्यांनी आपलं टाळकं थोपटलेसुद्धा. त्या शिकवणीची आजच्या या घडीला माणसाला खूप गरज आहे.'
मनाला कंट्रोल करण्याचे काम संतपरंपरा करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आज आपण म्हणतो की माणसाने सगळी प्रगती केली आहे. भारताने चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचलं. सगळीकडे आसमंतात- आंतरिक्षात आपण गेलो. पण अजूनही आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकलो नाही. हे काम मला वाटते संतपरंपरा ही अद्भूतरित्या आपल्याला वर्षानुवर्षे शिकवत आली आहे. त्या शिकवणीची आवश्यकता आहे. हा जो उपक्रम सकाळने आयोजित केला आहे त्याचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. चौथे माध्यम म्हणून सकाळने हे खूपच चांगले काम केले आहे. '
संत शिकवणीची आणि संत सन्मार्गाची आज या काळामध्ये आपल्या समजाला अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगित मनोज जोशी म्हणाले की, 'आपल्या संस्कृतीमध्ये भक्तीला जी अध्यात्माची जोड आहे. अध्यात्म म्हणजे फक्त भक्ती करत सुटा असे नाही. आपण त्यांच्या अभंगातून आणि ओव्यातून तीन गोष्टी जरी शिकलो तर आज लोकांना जे नैराश्य आले आहे ते दूर होईल. सुखसुविधा असून सुद्धा मुलांना नैराश्य येते. माझ्या पिढीमध्ये किंवा माझ्या आदल्या पिढीमध्ये इतक्या प्रतिकुल परिस्थितीमध्ये असून देखील शिकून लोकं मोठी झाली. आज सगळ्या सुख-सोयी आहेत. तुम्ही सगळ्या सुखसोयींनी युक्त आहेत तरी देखील तुम्ही म्हणता डिप्रेशनमध्ये आलोय. मग मुलं व्यसनाधिन होतात. सगळ्या देशामध्ये हे चित्र आपल्याला दिसत आहे. शाळा-कॉलेजमधील तरुण ड्रग्ज घेत आहेत.'
'जी बैठक असते विचाराची-अध्यात्माची आणि मानव जीवनाचे कल्याण कुठे तरी होईल ही शिकवण आपण विसरलो आहोत. कदाचित आई-बाप विसरले आहेत. प्रत्येक आई-बापांनी लहानपणापासून आपल्या मुलांना हे संस्कार द्यावेत, असे मला वाटते. रामदास स्वामींचा दासबोध किंवा मनाचा श्लोक मला नाही वाटत फ्राइड किंवा जगातील कुठल्याही मानसतज्ज्ञाने ऐवढ्या वर्षापूर्वी मनाचे श्लोक लिहून ठेवले आहेत. जे रामदास स्वामींनी लिहून ठेवले आहेत. हे इतके महान संत आहेत की मनाला कसे कंट्रोल करायचे हे त्यांनी सांगितले. विद्यार्थीदशेपासून ते वृद्धापकाळापर्यंत मनाला कसे कंट्रोल ठेवायचे आणि आयुष्यामध्ये कसे वागायचे याची शिकवण हे संत देतात. नैराश्य, पैशांची दौड, व्यसनाधिन होण्यापासून मुक्ती आणि माणसाला स्थैर्य लाभण्यासाठी संतशिकवणीची आणि संतसन्मार्गाची आपल्याला आवश्यकता आहे. हेच महाराष्ट्राचे वैभव आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.