Maharashtra State Marathi Film Awards 2025 Saam tv
मनोरंजन बातम्या

Marathi Film Awards: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची घोषणा; महेश मांजरेकर, मुक्ता बर्वेसह 'या' कलाकारांचा होणार सन्मान

Maharashtra State Marathi Film Awards 2025: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथे होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Maharashtra State Marathi Film Awards 2025: साठच्या दशकात महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा भव्यदिव्य सोहळ्यात यथोचित सन्मान करत वाटचाल सुरू करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता वरळी येथील डोम, एसव्हीपी स्टेडियम येथे होणार आहे.

राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ या पुरस्काराने गजलनवाज भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, २०२४ चा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांना तर चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याचबरोबर २०२४ चा स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना आणि स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना दिला जाणार आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सांस्कृतिक वारसा आणि इतिहास जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव या पुरस्काराने करण्यात येणार आहे. याशिवाय, ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारही यावेळी प्रदान केले जाणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पुरस्कार सोहळ्याचे वितरण होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची परंपरा पुढे नेणाऱ्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या हीरक महोत्सवी वाटचालीनिमित्त खास स्मरणिकाही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.

गेली ६० वर्षांहून अधिक काळ सातत्याने मराठी चित्रपटकर्मींचा सन्मान करणारा हा पुरस्कार सोहळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. केवळ मनोरंजन क्षेत्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातही हा हीरक महोत्सवी क्षणसोहळा अनोखा ठरणार असल्याचे महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे - पाटील यांनी सांगितले.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT