Fussclass Dabhade: दाभाडे कुटुंब सोनू आणि कोमलच्या लग्नाचा जल्लोष साजरा करत असतानाच या उत्साहात अधिक भर घालण्यासाठी आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘यल्लो यल्लो’ या हळदीच्या गाण्याने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवल्यानंतर आता, ‘तोड साखळी’ हे गोंधळाचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘तोड साखळी’ हे गाणं लग्नानंतरच्या गोंधळाच्या विधीवर आधारित असून सोनू आणि कोमलच्या लग्नानंतर दाभाडे कुटुंबाचे देवदर्शन आणि गोंधळाचा कार्यक्रम या गाण्यात पाहायला मिळत आहे.
या गाण्याचे शब्द सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत कारण ते जुन्या रूढी परंपरांची साखळी तोडूया असं दर्शवत आहेत. गाण्याच्या सुरुवातीला एक छोटा प्रसंग आहे त्यातून आपण विचारांनी पुढारण्याची गरज असल्याचा स्पष्ट संदेश मिळत आहे. ‘तोड साखळी’ या गाण्याला युवाशाहीर रामानंद उगले यांचा दमदार आवाज लाभला असून अमितराज यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. तसेच सगळ्यांची मनं जिंकणारे बोल हे क्षितिज पटवर्धन यांचे आहेत!
सध्या या चित्रपटाचे महाराष्ट्रात जोरदार प्रमोशन सुरु आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी निमगाव दावडीच्या खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घेत, चित्रपटाच्या यशासाठी खंडोबाचे आशीर्वाद घेतले. यावेळी प्रथेनुसार सिद्धार्थ चांदेकर याने मिताली मयेकरला उचलून घेत पायऱ्या चढत मंदिरात प्रवेश केला. तर चित्रपटातील अमेय वाघ - राजसी भावे या जोडीनेही प्रथेनुसार देवाचे दर्शन घेतले.
या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ ‘तोड साखळी’ हे गाणं आमच्यासाठी खूप खास आहे कारण, गोंधळासारखा पारंपरिक विधी यानिमित्ताने आम्ही दाखवला आहे. पण त्यातून जुन्या आणि बुरसटलेल्या विचारांना मागे टाकण्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश आम्हाला देता आला. याचं संपूर्ण श्रेय हे गीतकार क्षितिज पटवर्धन यांचं आहे. शिवाय या गाण्याची कोरीओग्राफी करण्याची संधी देखील मला या निमित्ताने मिळाली आहे, ज्याचा विशेष आनंद मला आहे. देवाला गाऱ्हाणे घालणारे हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.”
टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र निर्मित ‘फसक्लास दाभाडे’ २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग असून यात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.