चिनी अभिनेता, गायक आणि मॉडेल अॅलन यू मेंगलॉन्ग यांचे निधन झाले.
वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.
बीजिंगमध्ये इमारतीवरून पडून त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत पोलिसांनी कोणत्याही गुन्हेगारी घटकाचा सहभाग नसल्याचे स्पष्ट केले.
मनोजरंजन विश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. चीनचा प्रसिद्ध अभिनेता, गायक आणि मॉडेल अॅलन यू मेंगलॉन्गचे निधन झाले. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. बिल्डिंगवरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अभिनेत्याच्या टीमने त्याच्या मृत्यूचे वृत्त दिले. अभिनेत्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
चीनमधील एका न्यूज एजन्सीने अॅलन यू मेंगलॉन्गच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, गुरुवारी बीजिंगमध्ये इमारतीवरून पडून यू मेंगलॉन्गचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या घटनेत कोणताही गुन्हेगारी घटकांचा सहभाग असल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. चिनी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्याच्या टीमने एका निवेदनात म्हटले आहे की, अॅलन यू मेंगलॉन्गच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या पोलिसांनी कोणत्याही गुन्हेगारी घटनेची शक्यता नाकारली आहे.
अभिनेत्याच्या टीमने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्हाला हे सांगायला दु:ख होत आहे की आमच्या प्रिय अॅलन यू मेंगलॉन्गचे ११ सप्टेंबर रोजी बिल्डिंगवरून पडून निधन झाले. या प्रकरणात कोणत्याही गुन्हेगारी घटनेची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. आम्हाला आशा आहे की त्याच्या आत्म्याला शांती मिळो. '
चीनमधील एका पापाराझीने अॅलन यू मेंगलॉन्गच्या मृत्यूच्या बातमीबद्दल सर्वात आधी एक पोस्ट शेअर केली होती. पण ही पोस्ट नंतर काढून टाकण्यात आली. या पोस्टमध्ये पापाराझीने असे लिहिले होते की, 'इटरनल लव्ह' आणि 'गो प्रिन्सेस गो' मधील मुख्य अभिनेता अॅलन यू मेंगलॉन्गचे बीजिंगमध्ये निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. बिल्डिंगवरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या पोस्टनंतर एकच खळबळ उडाली आणि चर्चांना उधाण आले. त्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली.
यू मेंगलाँगच्या निधनाचे वृत्त कळताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर यू मेंगलॉन्गचे नाव गुगलवर ट्रेंड होऊ लागले. अॅलन यू मेंगलॉन्ग हा प्रसिद्ध चिनी अभिनेता होता. तो गायक म्हणून देखील प्रसिद्ध होता. त्याचा जन्म १५ जून १९८८ रोजी झाला होता. २००७ मध्ये त्याने 'माय शो, माय स्टाईल' या टॅलेंट रियालिटी शोमधून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. त्यानंतर २०११ मध्ये 'द लिटिल प्रिन्स' या लघुपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली. त्याने अनेक चिनी मालिकांमध्ये काम केले होते. त्याला सर्वाधिक ओळख 'एटरनल लव्ह' या चित्रपटातून मिळाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.