आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा' येत्या १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट यांची प्रस्तुती आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज झाले आहे.
'शिवरायांचा छावा'च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा नवा पोस्टर शेअर केला आहे. हा पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी "रक्तात उकळतो भगवा हा लाव्हा, रुद्ररुप गर्जतो शिवरायांचा छावा" असं कॅप्शन देत पोस्टर शेअर केले. बलदंड शरीरयष्टी, करडी नजर आणि जबरदस्त आत्मविश्वास असा छत्रपती संभाजी महाराजांचा हा लूक दिसतोय. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, संभाजी महाराज एका शक्तिशाली वाघासोबत झुंज देताना दिसत आहेत. पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांची ही भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मराठमोळा अभिनेता भूषण पाटील यांनी उचललं आहे.
मल्हार पिक्चर्स कं.चे वैभव भोर, किशोर पाटकर, मधू यांनी या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे. संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.