Actress Death: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या राजचे वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली. ही बातमी समोर येताच तिचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील अनेक जण भावुक झाले. इतक्या कमी वयात अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतल्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे.
अनन्या राजने आपल्या अभिनय कारकिर्दीत काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपटांसोबतच ती म्युझिक व्हिडिओंमध्येही झळकली होती. मनोरंजन क्षेत्रात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असायची. मात्र, निधनापूर्वी काही काळ ती सोशल मीडियापासून दूर होती.
कुटुंबीयांनीच तिच्या निधनाची बातमी सोशल मिडियावर दिली, यापोस्टमध्ये त्यांनी लिहिले, आम्ही अनन्यचे कुटुंबीय आहोत. अत्यंत दुःखाने आम्हाला हे कळवावे लागत आहे की, १५ जुलैच्या पहाटे अनन्यचे निधन झाले. झोपेतच तिने शांतपणे अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून ती शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करत होती आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी तिने एखाद्या योद्ध्याप्रमाणे लढा दिला. ती अत्यंत खंबीर मुलगी होती आणि तिने एखाद्या राणीसारखे आयुष्य जगले. बाळा, तुझी उणीव आम्हाला खूप भासेल. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. या कठीण काळात.
मुंबईत वाढलेल्या अनन्या राजने लहान वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. २०१६ मध्ये ती ‘७ अवर्स टू गो’ या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द फायनल एक्झिट’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली. २०१९ मध्ये ती ‘घोस्ट’ या चित्रपटातही झळकली होती. IMDb वरील माहितीनुसार, अनन्या राजचा जन्म २२ ऑक्टोबर १९९८ रोजी झाला होता. २८वा वाढदिवस साजरा करण्याच्या काही महिन्यांपूर्वीच तिचे निधन झाले.अनन्याच्या निधनाने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सोशल मीडियावर तिच्या आठवणींना उजाळा देत अनेक जण तिला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.