‘बिग बॉस मराठी ४’नंतर प्रचंड प्रकाशझोतात आलेल्या किरण मानेंची कायमच चर्चा सुरु असते. किरण माने नेहमीच सोशल मीडियावर सामाजिक, राजकीय क्षेत्रासह अभिनय क्षेत्रातही घडत असलेल्या घटनांवर आपलं परखड मत मांडण्याचा प्रयत्न करतात. ‘सातारचा बच्चन’या टोपण नावाने किरण मानेंना बिग बॉसच्या घरामध्ये खरी ओळख मिळाली होती. आज बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ८१ वा वाढदिवस. किरण मानेंनी खास बिग बींच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूडच्या शहेनशाह यांचे ते बालपणी चित्रपट कसे व कुठे पाहायचे? याचा खुलासा किरण मानेंनी पोस्टद्वारे केला आहे. बेधडक व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या बिग बींच्या स्वभावात गेल्या काही वर्षात कसा बदल झाला याबद्दलही किरण मानेंनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. आपल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “…. या पोस्टबरोबर टाकलेलं हे मीम खरंतर बिग बॉसमध्ये ‘सातारचा बच्चन’ हा टॅग मिळाल्याची खिल्ली होती. पण तरीबी ‘मराठी मीम मॉक्स’वरचं हे मीम बघून मी लै हसलो होतो. लैच भारी वाटलंवतं. शाळेत असल्यापास्नं ह्या टोमन्याची सवय हाय मला.
किरण माने आपल्या पोस्टमध्ये पुढे सांगतात, “…किरण्या माने सोत्ताला बच्चन समजतो.” लहानपनापास्नं ऐकत आलोय. खरंतर म्हणणाऱ्यानं ते चिडून म्हणलेलं असायचं, पण मनातल्या मनात मी लै खुश व्हायचो! लहाणपनी ‘बच्चन’ हे माझं ‘जग’ होतं... मायनीच्या ‘गरवारे टुरींग टॉकीज’च्या तंबूत बच्चनच्या पिच्चरचं रीळ आल्यापासनं मी तिथं हजर असायचो. आलेली पोस्टर्स उलगडून बघSSSत रहाणं हा आवडता छंद होता… रीळ चेक करताना टाकलेले फिल्मचे तुकडे मी घेऊन यायचो… मग ती फिल्म बल्बपुढं धरून एकेका फ्रेममधला बच्चन न्याहाळत बसायचा नाद होता.. पिक्चर जाईपर्यंत रोज बघायचो मी. पाठ व्हायचा पिच्चर.. मग खंडोबाच्या माळावर दोस्त जमवून त्यांना बच्चनची ॲक्टिंग करून दाखवत अख्ख्या पिच्चरची स्टोरी सांगायची… बच्चनचं चालनं, बोलणं, बघणं, उभं रहाणं, बसणं, पळणं, फायटिंग करणं सगळं- सगळं माझ्यात भिनलंव्हतं लहानपणी.”
पुढे किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “…त्याचवेळी कधीतरी अन्यायाविरूद्ध लढणारा, जुलमी व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारणारा, गोरगरिबांसाठी पैशेवाल्यांशी पंगा घेणारा ‘अँग्री यंग मॅन’ मनामेंदूत, रक्तात भिनला! आता तरूणपणी मी कॉलेजमध्ये हौशी नाट्यक्षेत्रात कुणावर अन्याय झाला की पुढाकार घेऊन नाटकातल्या प्रस्थापितांशी पंगे घ्यायला सुरूवात केल्यावरही आजूबाजूचे म्हणायला लागले, “हा काय स्वत:ला बच्चन समजतो का काय?”… ते ऐकूनबी मला लय भारी वाटायचं! पण खरे धक्के बसायला सुरूवात झाली ती अलीकडच्या दहाबारा वर्षांत! तोच ‘अँग्री यंग मॅन’ वैयक्तिक आयुष्यात व्यवस्थेला शरण जाणारा, मान खाली घालून स्वाभिमान गुंडाळून ठेवणारा हा ‘शहेनशाह’ बघून वाईट वाटायला लागलं… पूर्वी पेट्रोल ६० रूपये झाल्यानंतर सोशल मीडियावरुन जहरी टीका करणारा बच्चन आज पेट्रोल गगनाला भिडूनबी ‘चुप्पी साधलेला’ बघून आश्चर्य वाटायला लागलं…”
पोस्टच्या शेवटच्या भागात किरण माने सांगतात, “कुणाच्यातरी आदेशावरनं आरेच्या वृक्षतोडीचं समर्थन करण्याची पोस्ट करणारा, ज्या पंजाबनं त्याला मुलगा मानलं, त्या पंजाबी शेतकर्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा मूग गिळून गप्प बसणारा, केविलवाना बच्चन बघून किव यायला लागली. पण लै विचार केल्यावर एक लक्षात आलं की, या माणसाणं त्याच्या अभिनयाच्या ताकदीवर जो ‘बच्चन’ आपल्या मनामेंदूत-रक्तात धगधगता ठेवलाय तीच त्यानं आपल्याला दिलेली ताकद! बच्चननं स्वत:मधला ‘बच्चन’ हरवला पण आपल्यामध्ये तो आहेच की…जिवंत, रसरशीत, खणखणीत!! त्यानं त्याचं आयुष्य कसं जगायचं ते आपण नाय ठरवू शकत. आपल्याला जे हवंय ते त्यानं दिलंय, भरभरुन.. बस्स !!! सलाम महानायक, कडकडीत सलाम… ”
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.