Bhau Kadam On Nilesh Sabale: मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांनी अलीकडेच आपल्या सहकलाकार आणि सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या डॉ. निलेश साबळे यांचं मनापासून कौतुक केलं आहे. निलेश साबळे आपला पहिलाच चित्रपट ‘चंद्रकांता’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात ते केवळ नायक म्हणूनच नाही, तर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणूनही काम करत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
भाऊ कदम यांनी मुक्कामपोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “निलेश हा अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक माणूस आहे. तो काम करताना दिवसाचे १२ ते १४ तास घालवतो. एवढ्या समर्पणाने तो काम करतो म्हणून त्याला नक्कीच यश मिळणार यात शंका नाही. त्याच्या या पहिल्या चित्रपटाच्या यशासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.” त्यांनी पुढे असंही म्हटलं की, पहिला चित्रपट असल्यामुळे निलेशवर जबाबदारी आणि अपेक्षांचं ओझं आहे, पण त्याच्या चिकाटीमुळे तो हे आव्हान नक्कीच पेलून दाखवेल.
‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून डॉ. निलेश साबळे यांना मोठी ओळख मिळाली. सूत्रसंचालनाची त्यांची शैली, विनोदबुद्धी आणि थेट प्रेक्षकांशी जुळलेलं नातं यामुळे ते घराघरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा शोही प्रेक्षकांसमोर आणला. दोन्ही कार्यक्रमांमधून त्यांनी हास्याची पर्वणी दिली आणि मराठी टेलिव्हिजनवर आपली वेगळी छाप उमटवली. निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात सध्या काम करत नसल्यामुळे मोठी चर्चा रंगली होती. पण, आता मात्र ते पडद्यामागील जबाबदाऱ्याही स्वीकारत मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवत आहेत.
भाऊ कदम आणि निलेश साबळे यांची मैत्री ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरच घट्ट झाली. भाऊ कदम स्वतः मराठी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत प्रवास करणारे अनुभवी कलाकार आहेत. त्यांच्याकडून मिळालेलं कौतुक हे निलेशसाठी मोठं प्रोत्साहन आहे. भाऊ कदम यांनी दिलेलं हे आशीर्वादाचे आणि प्रोत्साहनाचे शब्द निलेशच्या आगामी प्रवासासाठी बळ ठरणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.