पीएम सूर्य घर मोफत वीज योजना
घराच्या छतावर रूफटॉप सोलर बसवण्यासाठी पात्र ग्राहकांना आर्थिक मदत
पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ
अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरा
उन्हाळ्यात घरात एसी, कूलर, पंखे आणि फ्रिजचा वापर वाढल्याने तुमचा वीज बिलाचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो ना? अशा परिस्थितीत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारची 'पीएम सूर्य घर मोफत वीज बिल योजना' फायदेशीर ठरत आहे. या योजनेअंतर्गत सौरऊर्जा निर्मितीसोबतच सरकारकडून सबसिडीही दिली जाते. वीजही मोफत आणि पैशांचीही बचत झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
केंद्र सरकारने २०२४ मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश देशातील एक कोटी घरांना सौरऊर्जेशी जोडणे हा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ५१ लाखांहून अधिक घरांमध्ये या योजनेचा लाभ पोहोचला आहे. तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याचा लाभ मिळू शकतो.
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलर पॅनेलच्या क्षमतेनुसार केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. १ किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, तर २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. तसेच ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेची सोलर पॅनेल बसवल्यास केंद्राची कमाल सबसिडी ७८ हजार रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे, जर एखाद्या ग्राहकाने ५ किलोवॅटचा सोलर पॅनेल बसवला, तरी केंद्र सरकारची सबसिडी ७८ हजार रुपयांपर्यंतच राहते. म्हणजेच ३ किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेसाठी अतिरिक्त केंद्रीय सबसिडी मिळत नाही.
काही राज्ये केंद्राच्या सबसिडीव्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक मदत देतात. उदाहरणार्थ, उत्तर प्रदेशमध्ये पात्र ग्राहकांना ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या सोलर सिस्टिमसाठी अतिरिक्त ३० हजार रुपयांची मदत मिळू शकते. त्यामुळे केंद्र आणि राज्याची मदत मिळून एकूण लाभ १ .०८ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
योजनेसाठी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो.
वेबसाइटवर जाऊन ‘Apply for Rooftop Solar’ हा पर्याय निवडा.
त्यानंतर राज्य आणि वीज वितरण कंपनीची माहिती, ग्राहक क्रमांक, मोबाइल नंबर व ई-मेल भरावा.
पुढे लॉगिन करून अर्ज केल्यानंतर DISCOM कडून व्यवहार्यता मंजुरी मिळते.
मंजुरीनंतर नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनेल बसवता येतात.
इंस्टॉलेशननंतर नेट मीटरसाठी अर्ज करावा लागतो.
DISCOM तपासणी आणि कमिशनिंग प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बँक खात्याची माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर पात्र सबसिडीची रक्कम खात्यात जमा केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.