सणासुदीच्या हंगामात देशभरात आकर्षक ऑफर्स सुरू होत असताना लोकप्रिय पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी एक खास आणि आकर्षक भेट जाहीर केली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की आता पेटीएमवर केलेल्या प्रत्येक पेमेंटसाठी यूजर्सना सोन्याचे नाणे रिवॉर्ड म्हणून मिळणार आहे. या ऑफरचा उद्देश ग्राहकांना डिजिटल व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि यूपीआय बाजारपेठेत आपली स्थिती पुन्हा मजबूत करणे हा आहे.
कंपनीने एक्सचेंज फाइलिंगद्वारे दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरनुसार प्रत्येक व्यवहारावर यूजर्सना त्याच्या मूल्याच्या १ टक्के किमतीचे सोन्याचे नाणे दिले जाईल. ही नाणी डिजिटल सोन्यात बदलता येतात. उदाहरणार्थ, १०० सोन्याच्या नाण्यांचे मूल्य १ रुपया आहे. जे ग्राहक इच्छेनुसार डिजिटल सोन्याच्या स्वरूपात रूपांतरित करू शकतात. ही ऑफर पेटीएमद्वारे केलेल्या सर्व प्रकारच्या पेमेंटसाठी लागू असेल, मग ते व्यापाऱ्यांना क्यूआर कोडद्वारे पेमेंट असो, ऑनलाईन पेमेंट, मनी ट्रान्सफर, रिचार्ज, बिल पेमेंट किंवा ऑटोमॅटेड पेमेंट असो.
या योजनेत यूपीआय पेमेंट्स, डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंट्स तसेच नेट बँकिंगद्वारे केलेले व्यवहारही समाविष्ट आहेत. कंपनीने असेही सांगितले आहे की जे यूजर्स क्रेडिट कार्ड किंवा रूपे क्रेडिट कार्डद्वारे यूपीआय पेमेंट करतील, त्यांना दुप्पट फायदा मिळेल. म्हणजेच इतर यूजर्सच्या तुलनेत त्यांना दुप्पट सोन्याची नाणी दिली जातील. हे यूजर्सना क्रेडिट कार्ड व्यवहारांसाठीही प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न असल्याचे मत आहे.
पेटीएमचे हे नवीन उपक्रम सणासुदीच्या काळात सुरू केल्यामुळे ग्राहकांमध्ये विशेष उत्साह आहे. गेल्या काही महिन्यांपासून यूपीआय मार्केटमध्ये कंपनीचे अस्तित्व घटले होते. २०२४ पर्यंत पेटीएमचा मार्केट शेअर १३ टक्के होता. मात्र पेटीएम पेमेंट्स बँकेवर आलेल्या निर्बंधांनंतर हा आकडा फक्त ७ टक्क्यांवर खाली आला. त्यामुळे ही नवीन रिवॉर्ड योजना कंपनीसाठी ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची संधी ठरू शकते.
कंपनीच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये पेटीएमने तब्बल १.४ अब्ज यूपीआय व्यवहार नोंदवले. जे मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १ अब्जने जास्त आहेत. याशिवाय, कंपनीने जून २०२५ मध्ये ₹१२३ कोटींचा नफा नोंदवला असून, गेल्या वर्षी याच कालावधीत झालेला ₹८४० कोटींचा तोटा भरून काढण्यात ती यशस्वी ठरली आहे.
या नव्या सोन्याच्या नाण्यांच्या ऑफरमुळे पेटीएमला सणासुदीच्या वातावरणात ग्राहकांचा सहभाग वाढवण्याची आणि डिजिटल व्यवहार अधिक व्यापक करण्याची संधी मिळणार आहे. विश्लेषकांच्या मते, ही योजना केवळ ग्राहकांना आकर्षित करणारच नाही, तर मार्केटमध्ये पेटीएमचा ब्रँड पुन्हा मजबूत करण्यासाठीही असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.