जम्मू-काश्मीर सरकारचा मोठा निर्णय
AAY कुटुंबांना वर्षाला 6 LPG सिलिंडर मोफत देणार
योजनेचा लाभ सर्व LPG ग्राहकांना नव्हे, तर पात्र AAY कुटुंबांनाच मिळणार
LPG रिफिलची रक्कम DBTद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार
सणासुदीच्या तोंडावर घरगुती गॅसच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी जम्मू-काश्मीर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना वर्षाला सहा LPG सिलिंडर मोफत देण्याच्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयाची माहिती नागरिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री सतीश शर्मा यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत दिली. या योजनेचा लाभ जम्मू-काश्मीरमधील सर्व LPG ग्राहकांना मिळणार नसून केवळ AAY अंतर्गत पात्र ठरणाऱ्या कुटुंबांनाच मिळणार आहे.
सरकारने यापूर्वी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत वर्षातील सहा LPG रिफिलची किंमत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा प्रस्ताव आहे. DBT द्वारे ही रक्कम देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या खर्चापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.तसेच DBT द्वारे पैसे मिळवण्यासाठी तुमचा आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे.
सप्टेंबरमध्ये विधानसभेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 8.79 लाख AAY लाभार्थी आहेत. मात्र, प्रत्यक्षात योजनेचा लाभ घेणाऱ्या अंतिम लाभार्थ्यांची संख्या तसेच पैसे देण्याची प्रक्रिया सरकारकडून जारी होणाऱ्या सविस्तर आदेशांनंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, देशातील सर्वाधिक महाग घरगुती LPG सिलिंडर लेहमध्ये मिळत असल्याचेही समोर आले आहे. लेहमध्ये घरगुती LPG सिलिंडरची किंमत 1,179 रुपये असून, दिल्लीच्या तुलनेत तो सुमारे 237 रुपयांनी महाग आहे. तर कमर्शियल LPG सिलिंडरची किंमत तब्बल 3,385.50 रुपये आहे. कमर्शियल सिलिंडरच्या बाबतीतही दिल्लीच्या तुलनेत लेहमध्ये सुमारे 638 रुपयांचा फरक आहे. एकीकडे LPGच्या किमती आणि घरगुती खर्चाचा मुद्दा चर्चेत असताना जम्मू-काश्मीर सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.