माणसाचं भावविश्व जाणून घेताना त्याच्या संपूर्ण आयुष्याचा जीवनपट माहिती असणं आवश्यक असतं. माणूस त्याच्या भोवतालच्या परिस्थिनुरूप घडत असतो. त्याच्यावर त्याच्या परिसरातील बदलांचे आणि माणसांचे पडसाद उमटत असतात. एखादा संवेदनशील माणूस टिपकागदासारखं त्याच्या आजूबाजूला घडणारं टिपून घेत असतो. त्यातून त्याची अभिव्यक्ती, विचार पद्धती आकार घेत असते.
गणेश शिंदे हा मूळचा लातूरचा. घराचा मुख्य व्यवसाय शेती. तूर नागलीच पीक घेताना हळूहळू सगळ्या शिवरावर सोयाबीनने ताबा घेतला. वडील आर्मीत सैन्य दलात नोकरीला. देशसेवा करण्यात व्यग्र. गणेशला फक्त चित्र सुचायची. त्याचे मार्गदर्शक म्हणजे त्याच्या शाळेतले शिक्षक. घरातून चित्रकलेचा किंवा कोणत्याही कलेचा वारसा नाही. मार्गदर्शन नाही. तेव्हा गणेशचे स्वप्न चित्रकला शिक्षक व्हायचे. या स्वप्नाच्या बळावर गणेशने चित्रकला शिक्षक होण्यासाठीचा डिप्लोमा लातूर मधूनच घेतला. आणि त्यानंतर त्याने पुण्याची वाट धरली.
पुणे शहर. शहराचे रंग वेगळे. रूप वेगळं. दृष्टी तीच, आयाम बदलले. गावातला दुष्काळ पाहणारा दृष्टिकोन शहरात आल्यावर बदलतो का? काय सांगतो? काय नवं देतो? काही शिकवतो का? वयाशी संबंध सुटतो आणि माणूस प्रगल्भ होतो. प्रतिभा उपजत असते, अनुभवातून आलेल्या संवेदनशीलतेची जोड मिळाली की प्रश्न पडू लागतात आणि कलाकार त्यांची उत्तर शोधू लागतो.. मूर्ततेकडून अमूर्ततेच्या विभ्रमांशी खेळू लागतो.
गणेशला पूर्वीपासूनच जलरंगांची आवड होती. पण जलरंगात काम किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतं त्याला पुण्यात आल्यावर कळू लागले. त्यासाठी गरजेचे स्थित्यंतर पुण्यात आल्यावर झाले. पुण्यात आल्यावर जलरंगांचा प्रभावी वापर कसा करावा हे समजू लागले.. त्यानंतर चित्र रंगवण्याची पद्धतीही बदलली. जलरंग वापरताना कुंचले, रोलर अशा अनेक माध्यमातून तो काम करू लागला. मनाला येईल त्या कोऱ्या कोपऱ्यावर हरवून जाऊ लागला. शुभ्र कॅनव्हासवर रंग उमटू लागले. अर्थ साकार होऊ लागले. आणि मग गणेश ला परत प्रश्न पडू लागले.
आपण जे करतोय ते काय आहे? ती चित्र आहेत का? ती चित्र तर नक्कीच नाहीत. मग काय? केवळ रंग? पण त्या रंगांचं काही म्हणणं आहे. ठाम काही सांगणं आहे. आणि गणेशला त्यातून आनंद मिळत होता. त्याचे कुंचले बेफिकिरीने रंग उधळू लागले.. दुष्काळी शेताकडे पाहताना कोरड्या डोळ्यांचा रोटाव्हेटर फिरावा तसा त्याचा रोलर कॅनव्हासवर फिरू लागला. दुष्काळ मूर्तिमंत साकार होऊ लागला. त्यात जशी विदारकता होती, तशीच ओढही. तसाच आनंद आणि तशीच अपेक्षा... अवहेलनाही होती आणि ईर्ष्याही. गणेश मग एखाद्या मनस्वी कुंचल्यासारखा भरकटत राहिला, मोकळा होत गेला कॅनव्हासवर. कुठे त्याच्या अस्तित्वाचा ठिपकही जाणवतो, कुठे त्याची उठून दिसणारी ऊर्जा रसिकाला हतबल करते.
ही सगळीच चित्र अमूर्त शैलीतली आहेत. यात सूर्योदय, सूर्यास्ताचा भास होतो, केव्हा अवकाशाचा तुकडा गवसतो किंवा कधी आपण केवळ त्यात कलाकाराला शोधात राहतो. त्याच्या चित्रांबद्दल तो फारसं बोलत नाही पण चित्राच्या प्रवासाविषयी विचारल्यावर त्याने दिलेलं उत्तर मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं समर्पक वाटलं. तो म्हणतो, "चित्र पूर्ण करताना कधी काही तास लागतात तर कधी काही दिवस सुद्धा! केव्हा केव्हा चित्र पूर्ण व्हायला अनेक दिवस घेतो मी. मात्र या प्रवासात कुठे थांबावं हे चित्रकाराला कळलं की त्याला कलाकार म्हणावं. त्यावर त्या चित्रच मूल्य ठरत असतं."
गणेशने लहान वयात अनेक ठिकाणी स्वतःची चित्र प्रदर्शनात ठेवली आहेत. नुकतेच मुंबईच्या जहांगीर कला दालनात त्याच्या चित्रांचं प्रदर्शन झालं. जहांगीरच्या अनेक चित्रांनी मिरवलेल्या आणि मग ७ दिवसांनी पुन्हा कोरड्याच राहिलेल्या भिंतींनी हे अमूर्त आक्रोशही उराशी उचलून धरले. पुढच्या चित्रप्रवासासाठी अनेकानेक शुभेच्छा!
Written By : मृगा वर्तक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.