Delhi Crime Podcast Saam TV
ब्लॉग

Crime Podcast: दिल्ली हायप्रोफाइल हत्याकांड; तत्कालीन राष्ट्रपतींच्या खासगी डॉक्टरच्या पत्नीच्या हत्येनं अख्खा देश हादरला

Crime Podcast: दिल्लीतील एका बंगल्यात खुनाची भीषण घटना घडली, ती ४ डिसेंबर १९७३ या दिवशी.

साम टिव्ही ब्युरो

Crime Unplugged | Marathi Crime Podcast: काही गुन्हे असे असतात की ज्यांची आठवण तशाच पद्धतीचा गुन्हा भविष्यात घडला की काढली जाते. दिल्लीत गाजलेलं विद्या जैन खून प्रकरण हे यातलंच एक प्रकरण. १९७० च्या दशकात वृत्तपत्रांचे मथळे गाजवलेलं. ज्यावेळी एखाद्या उच्चभ्रू कुटुंबात खुनासारखी घटना घडते त्यावेळी त्याचा समाजमनावर मोठा परिणाम होत असतो. याही प्रकरणाबाबत तेच झालं होतं. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या प्रकरणाची चर्चा होत राहीली.

दिल्लीची डिफेन्स कॉलनी ही पॉश लोकॅलिटीमधली वसाहत. बड्या बड्या हस्तींची निवासस्थानं या परिसरात आहेत. यापैकी एका बंगल्यात खुनाची भीषण घटना घडली, ती ४ डिसेंबर १९७३ या दिवशी.

या वसाहतीतल्या एका बंगल्यात राहणारे डॉ. नरेंद्र सिंग जैन हे प्रख्यात नेत्रविषारद संध्याकाळी सातच्या सुमारास आपल्या घरात शिरले. घरात त्यांची पत्नी विद्या होती. (चलो हमे दिदी के घर जाना है जल्दी तैय्यार हो जाओ) त्यांनी विद्याला सांगितलं. या दोघांना डॉ. जैन यांच्या बहिणीच्या घरी जायचं होतं. काही वेळातच विद्या जैन तयार झाल्या आणि हे दोघंही घराबाहेर पडले. समोरच डॉ. जैन यांची कार उभी होती. (Crime News)

कारच्या उजव्या दरवाजाच्या दिशेनं डॉ. जैन गेले. गाडीचं दार उघडण्यासाठी किल्ली लावणार इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मागंच घराबाहेर पडलेली विद्या दिसत नाहीये. त्यातच त्यांना डाव्या बाजूला काहीतरी गडबड ऐकू आली. ते गाडीच्या डाव्या बाजूकडं आले. जवळच असलेल्या एका नालीच्या काठाशी त्यांना एक व्यक्ती पडलेली दिसली. ते त्या व्यक्तीच्या दिशेनं निघाले आणि या नाल्यातून उडी मारून एक इसम बाहेर आला. त्यानं हातातलं पिस्तुल डॉ. जैन यांच्या दिशेनं रोखलं. डॉ. जैन जागीच थांबले. ते थांबल्याचं पाहून तो इसम आणि त्याच्या मागून आणखी एक इसम वेगानं बंगल्याबाहेर पडले.

ते दोघं गेल्याचं पाहून डॉ. जैन नालीजवळ गेले. हो, तिथं त्यांची पत्नी विद्याच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या अंगावर वार दिसत होते. डॉ. जैन यांनी घरातल्या नोकरांच्या सहाय्यानं उचललं आणि आपल्या गाडीत घालून गाडी वेगानं जवळच असलेल्या नर्सिंग होमच्या दिशेनं दामटली. (सॉरी डॉक्टर, शी इज नो मोअर). नर्सिंग होमच्या डॉक्टरांनी दुःखद बातमी डॉ. जैन यांना सांगितली. दुर्दैवानं नर्सिंग होममध्ये पोहोचायच्या आधीच विद्याचा मृत्यू झाला होता. (Saam TV Podcast)

डॉ. जैन यांनी नर्सिंग होममधूनच विद्याच्या भावाला आपल्या मेव्हण्याला म्हणजेच जनरल विरेंद्र सिंग यांना फोन केला. डॉ.जैन हे दिल्लीतलं बडं प्रस्थ होतं. जनरल विरेंद्र सिंगही बड्या हुद्द्याचे अधिकारी. त्यामुळं ही घटना तातडीनं वरिष्ठ पातळीवर पोहोचली.

पोलिस तपास सुरु झाला. त्यातून जे बाहेर आलं त्यामुळं दिल्ली हादरली. कुठलाही गुन्हा करताना गुन्हेगार काही ना काही माग ठेऊनच जातो. गुन्ह्यांचा तपास करताना पोलिस अधिकाऱ्यांना काही प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरं त्यांना आरोपीच्या दिशेनं घेऊन जातात.

या गुन्ह्यात कुठलीही चोरी झाली नव्हती. म्हणून ती शक्यता मावळली होती. हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचं दिसत होतं. हल्लेखोरांनी केवळ विद्यावरच हल्ला का केला, डॉ. जैन यांच्यावर का नाही. हा पोलिसांना पडलेला प्रश्न होता. डॉ. जैन यांनी हल्लेखोरांचा पाठलाग का केला नाही हा आणखी एक प्रश्न तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना पडला होता. तोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा हायप्रोफाईल मर्डर केसचा तपास सीआयडीकडं सोपवला होता.

थोडक्यात संशयाची सुई डॉ. जैन यांच्याकडे वळली होती. मग पोलिसांनी डॉ. जैन यांची माहिती काढायला सुरुवात केली. डॉ. जैन यांचं क्लिनिक गजबजलेल्या चांदणी चौकात होतं. तिथं आणि बाराखंबा रोडवरच्या ज्यांच्या दुसऱ्या क्लिनिकची पोलिसांनी झडती घेतली. डॉ. जैन यांच्या बँक खात्याच्या नोंदीही मागवण्यात आल्या. त्यातून नाव समोर आलं चंद्रेश शर्मा या महिलेचं. (Latest Breaking News)

चंद्रेश शर्मा १९६० च्या सुमारास वयाच्या विसाव्या वर्षीच विधवा झाली होती. १९६७ मध्ये तिनं कॅप्टन शर्मा नावाच्या एका अधिकाऱ्याशी लग्न केलं. त्याचवेळी तिनं डॉ. जैन यांच्या क्लिनिकमध्ये त्यांची सेक्रेटरी म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथंच त्या दोघांचं सूत जुळलं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यामुळे १९६७ च्या ऑगस्टमध्ये चंद्रेशनं आपल्या पतीपासून घटस्फोट मिळवला. दरम्यानच्या काळात विद्या जैन यांना या भानगडीचा सुगावा लागला होता. त्यामुळं त्यांनी नवऱ्याशी भांडून त्याला चंद्रेशला नोकरीवरुन हाकलून देण्यासाठी भाग पाडलं.

चंद्रेश एका आर्किटेक्टच्या ऑफिसात नोकरीला लागली. आता सगळं आलबेल झालंय असं विद्या जैन यांना वाटलं खरं. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. डॉ. जैन आणि चंद्रेश यांचे अनैतिक संबंध सुरुच होते. डॉ. जैन यांनी चंद्रेशला नोकरीवरुन काढल्यानंतरच तिला वेगवेगळ्या रकमांचे चेक दिल्याचं बँकेच्या स्टेटमेंटवरुन पोलिसांना समजलं. पोलिसांचा संशय पक्का झाला आणि त्यांनी चंद्रेशला उचललं. डॉ. जैन यांना आधीच अटक करण्यात आली होती.

चंद्रेशकडं तपास करताना तिनं डॉ. जैन यांच्याबरोबरचे काही फोटो पोलिसांना दिले. हे दोघं चक्क काही दिवस काश्मीरला हाऊसबोटीत जाऊन राहिले होते. तिथलेही फोटो पोलिसांनी चंद्रेशकडून जप्त केले. डॉ. जैनच आपल्या पत्नीच्या खुनाचा सूत्रधार असल्याचं आतापर्यंत स्पष्ट झालं होतं. प्रत्यक्षात हा खून घडवला कसा गेला याची माहिती सीआयडी अधिकाऱ्यांना चंद्रेशकडून समजली. कारण ही सगळी व्यवस्था तिनंच केली होती. दरम्यानच्या काळात या सगळ्या प्रकरणाची चर्चा माध्यमांच्या हेडलाईन्समधून होत होती. रोज या बातमीला पहिल्या पानावर स्थान मिळत होतं. ते होणं साहजिकच होतं म्हणा. कारण या प्रकरणातला सूत्रधार म्हणजेच डॉ. नरेंद्र सिंग जैन होता तत्कालिन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरींचा पर्सनल आय सर्जन.

(हाँ, हमनेही ये खून करवाया है. डॉ. जैन और मैने मिलकरही ये साजिश रची. मै सब बताती हूँ)

पोलिसांच्या चौकशीपुढं चंद्रेश टिकली नाही. तिच्याकडून या हत्येचा पूर्ण प्लॅन उघड झाला. चंद्रेशचा राकेश कौशिक २५ वर्षांच्या तरुणाचा परिचय होता. तिनं त्याला गाठलं. राकेशनं मग एका करणसिंग नावाच्या व्यक्तीला शोधलं. करणसिंग गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्याशी २० हजार रुपयांचा सौदा ठरला. यापैकी दहा हजार आधी आणि १० हजार विद्या जैन यांच्या हत्येनंतर द्यायचे ठरले. डॉ. जैननं राकेशच्या माध्यमातून करणसिंगला १० हजार रुपये दिलेही. मात्र, करणसिंग ते पैसे घेऊन गायब झाला. मग या तिघांनी पुन्हा प्रयत्न करायचं ठरवलं.

मग राकेशनं आपल्या ओळखीतून कल्याण नावाच्या एका गुन्हेगाराशी संपर्क साधला. आपला भगिरथ नावाचा एक मित्र तुम्हाला मदत करु शकेल असं कल्याणनं राकेश आणि चंद्रेशला सांगितलं. हे सर्वजण भगिरथला भेटले. मग भगिरथनं त्यांना एका टॅक्सीत बसवलं आणि ते सर्वजण राजस्थानमधल्या एका गावात जाऊन पोचले. ही टॅक्सी राकेशचाच मित्र रामजीची होती.

तिथं भगिरथनं या सर्वांची ओळख उजागरसिंग आणि कर्तारसिंग नावाच्या तरुणाशी करुन दिली. उजागरसिंगनं विद्या जैन यांचा खून करण्याची सुपारी म्हणून २५ हजार रुपयांची मागणी केली. राकेशनं तेवढे पैसे देण्याची तयारी दाखवली.

ही बोलणी झाल्यानंतर सर्वजण रामजीच्या टॅक्सीतून दिल्लीला आले. २ डिसेंबरच्या दिवशी या सर्वांनी डॉ. जैन यांच्या घराच्या परिसराची रेकी केली. ४ डिसेंबरच्या संध्याकाळी हे सर्वजण चांदणी चौक भागातल्या एका हॉटेलात जमले. काही वेळानं डॉ. जैनही तिथं आला. मी पुढं जातो, तुम्ही मागाहून या मी माझ्या बायकोला घेऊन घराबाहेर येतो. मग तुम्ही तिच्यावर हल्ला करा, असं डॉ.जैननं त्यांना सांगितलं. यावेळी चंद्रेशही त्यांच्याबरोबर होती.

त्यानुसार डॉ. जैन पुढं गेले, त्यांच्यामागून राजेश, भगिरथ, उजागर, कर्तारही रामजीच्या टॅक्सीमधून बसून डिफेन्स काॉलनीकडं निघाले. काही वेळातच चंद्रेशही तिथं पोहोचली. ती आणि राकेश डॉ. जैन यांच्या घराच्या दिशेनं चालत निघाले. तेवढ्यात त्यांना डॉ. जैन आणि विद्या जैन घरातून बाहेर येताना दिसले. दोघांनी बाहेर टॅक्सीजवळ असलेल्या साथीदारांना खूण केली. तातडीने उजागरसिंग आणि कर्तारसिंग या दोघांनी विद्या जैन यांना गाठलं. उजागरसिंगनं त्यांच्या गळा पाठीमागून आवळून धरला आणि कर्तारसिंगनं विद्या जैन यांच्या अंगावर हातातल्या चाकूनं वार केले. एका प्रेम-प्रकरणाबाई विद्या जैन यांना आपला प्राण गमवावा लागला.

पुढं या प्रकरणात खटला उभा राहिला. रामजीला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं. दिल्ली सत्र न्यायालयानं डॉ. जैन, चंद्रेश, कल्याण, उजागरसिंग आणि कर्तारसिंग आणि राकेश या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाच्या विरोधात सरकारनं अपिल केलं आणि दिल्ली उच्च न्यायालयानं उजागरसिंग आणि कर्तारसिंग या दोघांची जन्मठेप रद्द करुन त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या दोघांनाही नंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं आणि दिल्लीत घडलेलं एक हायप्रोफाईल मर्डर प्रकरण इतिहासाच्या पानात बंद झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT