निवृत्ती बाबर, मुंबई
VBA-ShivSena Alliance: शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्यापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. अशात वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आता आपल्या नव्या भूमिकेसाठी चर्चेत आहे. ठाकरे सरकार सत्तेत असताना जी वंचित बहुजन आघाडी सरकारवर टीका करत होती तीच वंचित बहुजन आघाडी आता ठाकरेंसोबत यायला तयार झाली.
अनेक दिवसांच्या चर्चेनंतर अखेर एका कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि प्रकाश आंबेडकर हे एकाच मंचावर येऊन संभाव्य युतीचे संकेत दिले. यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही युतीसाठी तयार आहोत याचा निर्णय ठाकरेंच्या सेनेने घ्यावा असं स्पष्ट करण्यात आलं. (Shivsena And Vanchit Bahujan Aghadi Alliance Blog)
यावरून एक स्पष्ट झालं की, वंचित बहुजन आघाडी युतीसाठी तयार असून आता चेंडू ठाकरेंच्या कोर्टात होता. याचाच फैसला करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची बैठक होतेय. याची मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली आहे. सुरवातीला बैठक वरळीला होईल असं म्हटलं जात असताना अचानक ती बैठक रद्द करुन ग्रँड हयातला बैठकीचे आयोजन करण्यात आले. (LIVE Marathi News)
वंचित बहुजन आघाडी शिंदे गटासोबत यावी यासाठी देखील प्रयत्न झाले होते. परंतु प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी स्पष्ट केलं की भाजपसोबत असणाऱ्या पक्षाला आमचा पाठिंबा नाही. त्यामुळे ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार हे स्पष्ट होत होतं. मात्र अजून देखील ठाकरेंनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली महाराष्ट्रात त्यांना स्थानिक स्वराज्य निवडणूकीत फायदा होऊ शकतो. त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेवर देखील फायदा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र येण्याविषयी शिवसेनेतील अनेक बडे नेते अनुकूल आहेत. मात्र स्वतः उद्धव ठाकरे यांना वंचित बहुजन आघाडीचा मागचा इतिहास पाहता त्यांना सोबत घेणे धोकादायक ठरू शकते, यामुळे शिवसेनेकडून निर्णयाला विलंब केला जातोय. (Breaking Marathi News)
दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी राजकारणात सक्रिय झाली तेव्हापासून वंचितला महाराष्ट्रातील भाजपची बी टीम म्हणून म्हटलं जात होतं. त्यामुळे वंचितला सोबत घेताना ठाकरे सावध भूमिका घेत आहेत. वंचित बहुजन आघाडीला फक्त शिवसेनेसोबत घ्यावे की, महाविकास आघाडीमध्ये घ्यावे याबाबतीत अजून एकमत नाही. त्यामुळे याबाबतीत महाविकास आघाडीत चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो.
वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्याविषयी अजूनही महाविकास आघाडीमध्ये चर्चा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी फक्त ठाकरे गटासोबत आल्यास याचा तोटा ठाकरे गटाला आहे. जर महाविकास आघाडीत गेल्यास महाविकास आघाडीमध्ये आणखी हिस्सेदार होऊ शकतो, हेच राष्ट्रवादी काँग्रेसला नको आहे आणि त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील दोन पक्ष ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्याशी चर्चा करतेय.
शिवसेनेचा मित्र म्हणून वंचित गेल्यास यामध्ये वंचितचा वाटा महाविकास आघाडीमध्ये न राहता केवळ शिवसेनेमध्ये राहील आणि त्याचा फटका ठाकरेंना बसेल. यामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद होऊ शकतात याचा परिणाम महाविकास आघाडीवर होऊ शकतो आणि फायदा मात्र शिंदे-फडणवीस विशेषतः भाजपला होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.