चंद्राबद्दल तुम्हा आम्हाला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. भारतासह अनेक देशांनी वेगवेगळ्या चांद्रमोहिमा राबवून चंद्रावरची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हाच चंद्र पृथ्वीपासून दूर जाऊ लागलाय. त्याचा परिणाम म्हणजे 24 तासांचा दिवस भविष्यात 25 तासांचा होऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत आत्तापासूनच दावे-प्रतिदावे व्हायरल होऊ लागले आहेत. साम टीव्हीनं या दाव्यांची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.
वैज्ञानिक दृष्टीकोनातून चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राचं आणि पृथ्वीचं एक भावनिक नातं आहे. अगदी छोट्यांच्या बडबड गीतांपासून ते पृथ्वीवरच्या भरती-ओहटीपर्यंत या चंदामामाची भूमिका महत्वपूर्ण राहिलीय. इतर ग्रहांच्या तुलनेत चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असल्यानं सर्वच देशांनी आपल्या शोधमोहिमांमध्ये पहिली पसंती चंद्रालाच दिलीय. मात्र हाच चंद्र आता पृथ्वीपासून दूर जाऊ लागलाय. होय, अगदी खरं ऐकलंय..सोशल मीडियात याबाबत काही दावे केले जातायेत. शास्त्रज्ञांच्या मते, भविष्यात अशी वेळ येईल की पृथ्वीवरचा दिवस 24 तासांचा नसेल तर 25 तासांचा होईल. व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहा.
चंद्र हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे. सध्या चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार 400 कि.मी. अंतर दूर आहे. 1.4 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी 18 तासांहून अधिक होता. काही कोटी वर्षांनंतर त्यात वाढ होत गेली.. यापुढील काही वर्षांत हीच प्रक्रिया तशीच सुरू राहील आणि दिवस २५ तासांचा होईल.
चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीपासून दूर गेल्यास पृथ्वीवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आम्ही व्हायरल मेसेजमागचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या टीमनं याबाबतचे तज्ज्ञांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या दाव्याबाबत आम्ही गुगल रिसर्चही केला. शास्त्रज्ञांनी मांडलेली मतंही जाणून घेतली. तेव्हा आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा.
व्हायरल सत्य
साम इन्व्हेस्टिगेशन
अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी चंद्राबाबत नुकतंच एक संशोधन केलंय. त्यांच्या संशोधकांनी 9 कोटी वर्षांपूर्वीच्या एका दगडाचा अभ्यास केला. त्यानंतर काही निष्कर्ष काढले. त्यानुसार चंद्र दरवर्षी सुमारे 3.8 सेंटीमीटर वेगानं पृथ्वीपासून दूर जात असल्याचं दिसून आलं. त्याचा परिणाम म्हणजे 200 दशलक्ष वर्षांत पृथ्वीवरील दिवस 25 तास चालेल.
या अभ्यासानुसार 1.4 अब्ज वर्षांपूर्वी, पृथ्वीवरील एक दिवस 18 तासांचा होता. मात्र चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्यानं दिवसाची लांबी सतत वाढत गेली. चंद्र जसा पृथ्वीपासून दूर जातोय तशी पृथ्वीची गती कमी होत आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत भविष्यात पृथ्वीवरचा दिवस 24 ऐवजी 25 तासांचा असेल हा दावा सत्य ठरलाय. आपला लाडका चंदामामा हाही आपल्यापासून दुरावतोय हा दावाही खरा असल्याचं दिसून आलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.