

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील रायसन क्षेत्रात पॅराग्लाइडिंग लँडिंग करताना मोठी दुर्घटना घडली. पायलट थेट अवकाशातून रस्त्यावर जोराने आपटला. या अपघातात पायलट जखमी झाला आहे. तर रस्त्याजवळच असलेले नागरिक आणि वाहने मोठ्या अपघातातून बचावले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पॅराग्लाइडरने रस्त्यावर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक अनियंत्रित झाला आणि थेट तो रस्त्यावर आपटल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते. पॅराग्लाइडर रस्त्यापासून काही फूट उंचावरच होता. मात्र, त्याला सुरक्षितपणे लँडिंग करता आले नाही. रस्त्यावर जोरात आपटल्याने तो जखमी झाला. प्राथमिक माहितीनुसार पॅराग्लाइडरची प्रकृती स्थिर आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि संबंधित प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने पायलटला रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ज्यावेळी पायलट रस्त्यावर पडला त्यावेळी तेथे वाहनांची वर्दळ होती. त्यावेळी एखाद्या वाहनाला धडक लागली असती तर मोठा अनर्थ घडला असता. यात कोणीही इतर जखमी किंवा वाहनांचे नुकसान झाले नाही. पायलटला तातडीने प्रथमोपचार देण्यात आले आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. प्राथमिक तपासानुसार, हवामान खराब असल्याने वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पायलटला तातडीने लँडिंग करावी लागली.
कुल्लू-मनाली हा भाग देशात पॅराग्लाइडिंगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वातावरणातील अनिश्चिततेमुळे इमर्जन्सी लँडिंगच्या घटना घडत आहेत. या घटनेनंतर अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची सुरक्षितता, लँडिंग झोन आणि हवामानानुसार उड्डाणांना आवश्यक परवानग्या देण्याच्या प्रक्रियेवर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षितता आणि नियम कठोर करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.