MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार सरकारला नाही, फडणवीसांनी सांगितलं कारण...VIDEO

MPSC Student Protest : पुण्यातील एमपीएससी आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांचे आंदोलन आता राजकीय आंदोलन झाले आहे, असे ते म्हणाले.

पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरुवातीला ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, पण आता ते राजकीय झाले आहे, असं फडणवीस म्हणाले. तसेच आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा राज्य सरकारला घेता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, पण पेपरफुटी झाली तेव्हा ते अध्यक्ष नव्हतेच. ते तेव्हा रुजूही नव्हते. पेपरफुटीनंतर ते रुजू झाले. त्यामुळे त्यांचा राजीनामा कसा घेता येईल, हे आधीच विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले. आम्ही या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यास तयार आहोत. त्यात कुणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी आहे. पण त्या काळात अध्यक्षपदी नव्हते, तर त्यांचा राजीनामा कोणत्या परिस्थितीत घ्यायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा अधिकार सरकारला नाही. जरी त्यांना हटवायचं झालं तर ते अधिकार राष्ट्रपतींना आहेत. पण त्यांच्याविरोधात चौकशी समितीनं अहवाल दिला, ते दोषी आहेत, असे जर सिद्ध झालं तरच त्यांना हटवण्यासंबंधी राष्ट्रपतींकडे शिफारस करता येईल, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. हे आंदोलन सुरुवातीला एमपीएससी विद्यार्थ्यांचं होतं. ते आता राजकीय झाले आहे. आता विद्यार्थ्यांचे आंदोलन राहिले नाही. पूर्ण राजकीय इव्हेंट आहे. तथापि आमचे सरकार नेहमी चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं. उच्च न्यायालयानंही ते आंदोलन बेकायदेशीर ठरवलं आहे. तिथे आंदोलनाला बसता येणार नाही हे सांगितलं आहे. तरीही न्यायालयाचा अवमान करून ते तिथे बसले आहेत. मुलांना न्याय देण्याचे जेवढे मुद्दे आहेत, ते सरकारने मान्य केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com