मयूर राणे, साम टीव्ही
मुंबईतील कुर्ला-ट्रॉम्बे रेल्वे सायडिंग परिसरातील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील झोपड्या ३० दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यासंदर्भात रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, ३५०० रहिवाशांवर निष्कासनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबर रोजी परिसरात नोटिसा लावण्यासोबतच बॅनरही लावण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, निर्धारित ३० दिवसांच्या मुदतीत जागा रिकामी न केल्यास बळाचा वापर करून रहिवाशांना हटवण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच, संबंधित झोपड्या पाडण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.