Yashaswi Jaiswal Run Out : यशस्वी १७५ धावांवर रन आऊट ! चूक कोणाची, शुभमन गिल की स्वतः जयस्वालची? VIDEO बघा
भारतीय कसोटी संघाचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल यानं दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात तडाखेबंद खेळी केली. शतक झळकावणारा यशस्वी द्विशतक करण्यात अयशस्वी ठरला. १७५ धावांवर खेळत असताना तो रनआऊट झाला. त्यानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली की नॉन स्टाइकला असलेल्या शुभमन गिलमुळं तो बाद झाला, यावरून आता सोशल मीडियावर राडा सुरू आहे. दुसरीकडं दिग्गज खेळाडूनं तर थेट ही शुभमनची चूक असल्याचं म्हटलं आहे.
जोरदार कमबॅक
मैदानात फलंदाजीला उतरला की हे आपलेच मैदान आहे. समोर कुठलाही गोलंदाज असो, मीच या मैदानातील राजा, अशा अविर्भावात खेळणं हा यशस्वी जयस्वालचा स्वभावच आहे. तो इतका खंबीर आहे की एक-दोन सामन्यात जर अपयशी ठरला तर, तो त्यानंतरच्या सामन्यात जीव ओतून खेळणार आणि अर्धशतक किंवा शतक झळकावणारच! वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही तो अपयशी ठरला होता. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात त्यानं नेहमीप्रमाणं कमबॅक केलं.
डोक्यावर हात मारला!
यशस्वीनं सुरेख फटकेबाजी करत शतकी खेळी केली. पण दुर्दैवानं १७५ धावांवर खेळत असताना तो रनआउट झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यशस्वीनं फलंदाजी सुरू केली. तो द्विशतक झळकावणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण त्याआधीच तो बाद झाला. गोलंदाज जेडन सील्सचा चेंडू टोलवून तो एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. पण रनआउट झाला. सील्सनं त्याला ऑफ स्टम्पवर फुल लेंथचा चेंडू फेकला. यशस्वीनं तो मिड ऑफच्या दिशेनं टोलवला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. पण ऐनवेळी शुभमन गिल माघारी फिरला. पिचमध्ये अर्ध्यावर आलेल्या यशस्वीला नाइलाजानं माघारी फिरावं लागलं. पण तो क्रिसमध्ये पोहोचला नाही आणि बाद झाला. यशस्वीनं गिलकडे नाराजी व्यक्त केली. तसंच गिलकडे बघून त्यानं डोक्यावरही हात मारला.
चूक कोणाची?
यशस्वी १७५ धावांवर बाद झाला. अवघ्या २५ धावांनी त्याचं द्विशतक हुकलं. बाद झाल्यानंतर तो निराश झाला. एक धाव होऊ शकली असती, असं तो गिलला सांगत होता. गिल फक्त त्याच्याकडं बघत राहिला. यशस्वीनंही त्याच्याकडं बघून डोक्यावर हात मारला. द्विशतक हुकल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आता सोशल मीडियावर जबरदस्त राडा सुरू झाला आहे. यशस्वी बाद झाला यात चूक कोणाची? अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चूक गिलची आहे, असं काही जण म्हणत आहेत. तर फिल्डरच्या हातात चेंडू जात असताना धावायची काय गरज आहे? त्यामुळं ही चूक यशस्वीचीच आहे, असं काही म्हणू लागलेत. शुभमन गिलनं यशस्वी जयस्वालला साथ द्यायला हवी होती. पण ऐनवेळी तो माघारी फिरला. मला वाटतंय की ही चूक नॉन स्ट्रायकर गिलची आहे, असं कॉमेंटेटर संजय बांगर यानं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.