
रोहित शर्माच्या वर्चस्वाला सुरुंग
शुभमन गिलनं वेस्ट इंडीजविरुद्ध झळकावलं शतक
विराट कोहलीच्या विक्रमाशीही केली बरोबरी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात दिल्लीत अरुण जेटली स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. कर्णधार शुभमन गिल यानं सुरेख फटकेबाजीनं सगळ्यांनाच मोहित केलं. पहिल्या कसोटी सामन्यात अर्धशतक झळकावणाऱ्या गिलनं यावेळी शतकी खेळी केली. कर्णधारपदाला साजेशी खेळी करणाऱ्या गिलनं रोहित शर्माचा विक्रमही मोडीत काढला. रोहितला मागे टाकत आता त्यानं भारताच्या महान फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं.
शुभमन गिल यानं या डावात १७७ चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं. कसोटी कारकीर्दीतील त्याचं हे दहावं शतक आहे. विशेष म्हणजे त्यानं ही सर्व शतके वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये झळकावली. WTC च्या इतिहासात गिल भारताकडून खेळताना सर्वाधिक शतके करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दहा शतके झाली आहेत. त्यानं भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला मागे टाकलं आहे. त्याच्या नावावर नऊ शतके आहेत.
रोहित शर्मा आता या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. गिलनंतर तिसऱ्या स्थानी भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल आहे. त्यानं आतापर्यंत ७ शतके झळकावली आहेत. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी प्रत्येकी ६ शतके ठोकली आहेत. तर रविंद्र जडेजा आणि विराट कोहली यांच्या नावावर प्रत्येकी ५ शतके आहेत.
शुभमन गिल यानं इंग्लंड दौऱ्यापासून भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे. कर्णधार होताच त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. कसोटी कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळताना सात सामन्यांत त्याने पाच शतके झळकावली आहेत. त्यातील चार शतके ही इंग्लंड दौऱ्यात तडकावली आहेत.
आता वेस्ट इंडीजच्या विरोधातही त्यानं हा कारनामा सुरूच ठेवला आहे. गिलने भारतीय कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत विराट कोहलीची बरोबरी केली आहे. विराटनेही एका वर्षात कर्णधार म्हणून पाच शतके केली होती. त्याने हा कारनामा दोनदा केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.