नेपाळचा 23 धावांनी धुव्वा उडवत टीम इंडियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सलामीवीर यशस्वी जयस्वालचं शतक आणि अखेरच्या षटकात रिंकू सिंगने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाने नेपाळसमोर विजयासाठी 203 धावांचं आव्हान ठेवलं होतं. (Latest Marathi News)
या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 179 धावांवर गारद झाला. नेपाळच्या संघाने आव्हानाचा पाठलाग करताना चिवट प्रतिकार केला. मात्र, ठराविक अंतराने विकेट्स गमावल्यामुळे नेपाळच्या संघाला विजय मिळवता आला नाही.
भारताकडून रवी बिश्नोई, आवेश खान आणि अर्शदीप सिंगने टिच्चून मारा केला. त्यामुळे नेपाळच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टीम इंडियाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सलामीच्या शतकी भागीदारीनंतर टीम इंडियाला (Team India) एकापाठोपाठ एक धक्के बसण्यास सुरुवात झाली. ऋतुराज गायकवाड 23 धावा काढून बाद झाला. त्यानंतर तिलक वर्मा आणि जितेश शर्माने देखील आपली विकेट्स फेकली. एकीकडे एकापाठोपाठ एक विकेट्स पडत असताना दुसरीकडे यशस्वीने फटकेबाजीचा सपाटा सुरुच ठेवला.
त्याने 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 49 चेंडूत आपलं शतकं पूर्ण केलं. शतकानंतर जयस्वाल बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या रिंकू सिंह आणि शिवम दुबेने नेपाळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
रिंकूने 15 चेंडूत झटपट 37 धावा कुटल्या, या खेळीत त्याने 2 खणखणीत चौकार आणि 4 सणसणीत षटकार ठोकले. त्याला दुबेने सुद्धा चांगली साथ दिली. त्याने 19 चेंडूत 25 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात दोघांनी केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला.
दरम्यान, 203 धावांचा पाठलाग करताना नेपाळचा संघ निर्धारित 20 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावांच काढू शकला. भारताकडून रवी बिश्नोई आणि आवेश खानने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगने 2 फलंदाजांना माघारी पाठवलं. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.